कांदा दरावरून पुणे-नाशिक हायवेवर शेतकऱ्यांचे वादळ...  प्रशासनाचे अडथळे तोडून 'रास्ता रोको'...

Share:
Main Image
Last updated: 02-Jun-2026

पुणे, (प्रतिनिधी) २ जून - कांद्याला प्रति किलो २५ रुपये हमीभाव मिळावा, यापूर्वी विक्री केलेल्या कांद्याला १५ ते २० रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे आणि २ लाख टनांऐवजी ८ ते १० लाख टन कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आज आंबेगाव तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांचे भव्य 'रास्ता रोको' आंदोलन पार पडले. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला.

प्रशासनाचे अडथळे झुगारून शेतकरी ठाम
या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, शेतकरी आणि नेत्यांना आंदोलनस्थळी पोहोचू न देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने महामार्गावर जागोजागी अडथळे (बॅरिकेड्स) उभारण्यात आले होते. मात्र, कांदा दरामुळे हवालदिल झालेल्या आणि संतापलेल्या शेतकरी बांधवांनी सर्व अडथळे पार करत मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी धाव घेतली व महामार्ग रोखून धरला.

Advertisement

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
हमीभाव: कांद्याला किमान २५ रुपये प्रति किलोप्रमाणे हमीभाव जाहीर करावा.
थकीत अनुदान: यापूर्वी विक्री केलेल्या कांद्याला प्रति किलो १५ ते २० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात यावे.
खरेदी मर्यादा वाढवा: शासनाने कांदा खरेदीची मर्यादा २ लाख टनांवरून थेट ८ ते १० लाख टन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार अशोकबापू पवार, आमदार अतुल बेनके आणि आंदोलनाचे मुख्य नियोजक व राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नेत्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. "शेतकऱ्यांच्या हक्काचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. परंतु, अन्यायाची परिसीमा झालेला बळीराजा आता गप्प बसणार नाही," असा इशारा नेत्यांनी दिला. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत महाविकास आघाडीच्या वतीने हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेगाव परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.