अखेर राज्य सरकाकडून शेतकरी कर्जमाफी जाहीर... कुणाला मिळणार लाभ? कोण राहणार वंचित...

Share:
Main Image
Last updated: 02-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २ जून - राज्यातील संकटात सापडलेल्या बळीराजासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ला अंतिम मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिकृत जाहीर घोषणा टाळण्यात आली असली, तरी मंत्रिमंडळाने या 'मेगा प्लॅन'वर शिक्कामोर्तब केले आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी तसेच ग्रामीण बँकांकडील थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, लाखो शेतकरी सातबाऱ्यावरील कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होणार आहेत.

३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांना लाभ
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकबाकीत गेले आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे. सहकार विभागाने राज्यातील सर्व बँकांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हा अंतिम आराखडा तयार केला असून, यात कोणत्याही जाचक अटी न ठेवता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन!
केवळ थकबाकीदारच नव्हे, तर प्रामाणिकपणे आणि वेळेवर बँकांच्या कर्जाची परतफेड करणाऱ्या नियमित शेतकरी बांधवांनाही सरकारने विसरलेले नाही. अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००0 रुपयांचे थेट आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ जवळपास २० लाख शेतकरी खात्यांना मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

'मिशन ३० जून': थेट बँक खात्यात पैसे जमा होणार
मंत्रिमंडळ बैठकीत केवळ योजनेला मंजुरीच देण्यात आली नाही, तर अंमलबजावणीच्या वेगावरही सविस्तर चर्चा झाली. शेतकरी खात्यांचे प्रमाणीकरण आणि डेटा संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३० जून २०२६ पूर्वी सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात कर्जमाफीची आणि अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. २० जूनपासूनच याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करण्याचे नियोजन सुरू आहे.

बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. कृषी आणि सहकार क्षेत्रातून या निर्णयाचे मोठे स्वागत होत असून, यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

 'शेतकरी कर्जमाफी २०२६' : एका नजरेत
योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
एकूण बजेट (अंदाजे) ३६,००० कोटी रुपये
लाभार्थी शेतकरी राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील सुमारे ५६ लाख शेतकरी
कर्जमाफीची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज पूर्णपणे माफ
नियमित कर्जदारांना लाभ ५०,००० रुपये सानुग्रह प्रोत्साहन रक्कम
अंतिम मुदत (Cut-off Date) ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार
पैसे जमा होण्याची तारीख ३० जून २०२६ पूर्वी थेट बँक खात्यात (DBT)

Comments

No comments yet.