नाशिक, (प्रतिनिधी) १ जून - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले आहेत. या सर्व उमेदवारी अर्जांची मंगळवार, दिनांक २ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई आणि प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे प्रामुख्याने उपस्थित होते.
असे आहे निवडणुकीचे पुढील वेळापत्रक
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानुसार:
अर्जांची छाननी : मंगळवार, २ जून २०२६ (सकाळी ११:०० वाजता)
अर्ज मागे घेण्याची मुदत : गुरुवार, ४ जून २०२६ (दुपारी ३:०० वाजेपर्यंत)
मतदान : गुरुवार, १८ जून २०२६ (सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० या वेळेत)
मतमोजणी : सोमवार, २२ जून २०२६
ज्येष्ठ सनदी अधिकारी मिलिंद शंभरकर निवडणूक निरीक्षक
या निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष काळजी घेतली आहे. आयोगाच्या वतीने निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) ज्येष्ठ अधिकारी मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे. ते निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष आणि नियंत्रण ठेवणार आहेत.
मतपत्रिकेवर होणार मतदान; ६२२ मतदारांना मिळणार प्रशिक्षण
नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी एकूण ६२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही मतदान प्रक्रिया 'इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे' (EVM) न होता 'मतपत्रिकेवर' (Ballot Paper) होणार आहे. मतदारांना मतपत्रिकेवर आपल्या पसंतीचा 'प्राधान्यक्रम' (Preference Order) आकड्यांमध्ये नोंदवायचा आहे. मतदानाचा हा तांत्रिक भाग लक्षात घेता, कोणताही मत बाद होऊ नये यासाठी संबंधित मतदारांना मतदानाचे विशेष प्रशिक्षण देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले.
४ जून रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या राजकीय आखाड्यात अंतिम चित्र काय असेल आणि लढत किती चुरशीची होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
?s=20