नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १ जून - केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील आगीच्या घटनेनंतर आता दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावर आपल्या उपरोधिक शैलीमुळे प्रचंड चर्चेत असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या डिजिटल राजकीय चळवळीने आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 'CJP'चे संस्थापक अभिजीत दिपके आगामी ६ जून रोजी अमेरिकेतून थेट भारतात परतणार असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वतः अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ जारी करत या आंदोलनाची अधिकृत घोषणा केली आहे.
१ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप
अभिजीत दिपके यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "NEET पेपर लीक प्रकरण, CBSE, CUET (UG) आणि SSC GD परीक्षांमधील कथित गोंधळ आणि एनटीएच्या (NTA) ढिसाळ कारभारामुळे देशभरातील सुमारे १ कोटींहून अधिक प्रामाणिक विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परीक्षेतील या सातत्यपूर्ण घोटाळ्यांमुळे आणि निर्माण झालेल्या मानसिक दबावामुळे अनेक निष्पाप विद्यार्थ्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे."
थेट विमानतळावर एकत्र येण्याचे आवाहन; ८ लाख विद्यार्थ्यांचा पाठिंबा
दिपके यांनी सोशल मीडियावरून देशभरातील विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना ६ जून रोजी थेट दिल्ली विमानतळावर एकत्र येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. विमानतळावरून सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थी एकत्र मिळून आधी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जातील. तेथे जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्यासाठी रीतसर परवानगी मागितली जाईल आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होईल.
विशेष म्हणजे, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CJP ने सुरू केलेल्या ऑनलाईन याचिकेवर (Online Petition) आतापर्यंत तब्बल ८ लाख विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला सक्रिय पाठिंबा नोंदवला आहे.
डिजिटल चळवळ आता प्रत्यक्ष मैदानात!
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या माध्यमातून देशातील परीक्षा पद्धतीतील त्रुटींवर उपरोधिक आणि मिश्कील भाषेत टीका केली जात होती. डिजिटल विश्वात लाखो तरुणांना आकर्षित करणारी ही चळवळ आता थेट दिल्लीच्या रस्त्यांवर उतरणार असल्याने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. ६ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि पालकांचे डोळे लागले आहेत.
?s=20