ठरलं हो ठरलं... महायुतीचे जागावाटप जाहीर... बघा, कुणाकडे कोणती जागा?

Share:
Main Image
Last updated: 31-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३१ मे - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी महायुतीचे (Mahayuti) अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रदेश आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर जागांच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंतिम तडजोडीनुसार भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर ही निवडणूक लढवणार आहे.

या जागावाटपात सुरुवातीला ७ जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला (शिंदे गट) ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अतिरिक्त एक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरली आहे.

महायुतीचा 'जागावाटप' तक्ता आणि पक्षांची यादी

सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, छ.संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा, नांदेड.

 शिवसेना

०४

ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 

०२ 

कोकण, पुणे

अडीच वर्षांपासून रिक्त जागांवर अखेर रणधुमाळी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, जिल्हा परिषद इ.) निवडणुका वेळेत न झाल्यामुळे या मतदारसंघांतील पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. परिणामी, गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या. नियम पाहत, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संखेच्या ७५ टक्के मतदार संख्या उपलब्ध असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. त्यानुसार आता या जागांसाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. उल्लेखनीय आहे की, विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून दिले जातात.

आधी कोणाचे वर्चस्व होते? (माजी आमदारांची स्थिती)
या १७ जागांपैकी पूर्वी सर्वाधिक जागा भाजप आणि शिवसेनेकडे होत्या. अहिल्यानगर (अरुणकाका जगताप), पुणे (अनिल भोसले) आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (अनिकेत तटकरे) या जागा राष्ट्रवादीकडे होत्या, ज्यातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (कोकण) आणि पुणे यंदाही राष्ट्रवादीला राखता आल्या आहेत. मात्र, अहिल्यानगरची जागा भाजपने आपल्याकडे घेतली आहे. काँग्रेसकडे असलेल्या सांगली-सातारा (मोहनराव कदम) आणि नांदेड (अमर राजूरकर) या दोन्ही जागांवर यावेळी भाजप निवडणूक लढवणार आहे.

निवडणूक कार्यक्रम: असा असेल पुढील प्रवास
निवडणुकीची अधिसूचना
२५ मे २०२६
निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत
०१ जून २०२६
इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस. महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार याच दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता.
उमेदवारी अर्जांची छाननी
०२ जून २०२६
दाखल झालेल्या सर्व अर्जांची कायदेशीर आणि तांत्रिक छाननी केली जाईल.
अर्ज माघारीची मुदत
०४ जून २०२६
बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांना शेवटची संधी. याच दिवशी लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
मतदान
१८ जून २०२६
सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आपले मत नोंदवतील.
मतमोजणी आणि निकाल
२२ जून २०२६
सकाळी मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारपर्यंत विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल.

Comments

No comments yet.