मुंबई, (प्रतिनिधी) २९ मे - राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये आणि कारखान्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावणाऱ्या कामगारांना पुन्हा नवजीवन मिळावे, यासाठी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी एका अत्यंत संवेदनशील आणि स्वागतार्ह निर्णयाची घोषणा केली आहे. आता अपघातग्रस्त कामगारांवर तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे तुटलेले हात पुन्हा प्रत्यारोपित (Replantation) करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाणार आहे. याची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांपासून करण्यात येणार आहे.
मंत्री ॲड. फुंडकर यांच्या सूचनांमधील मुख्य मुद्दे:
'गोल्डन अवर'चा वापर: अपघात घडल्यानंतरचे पहिले काही तास वैद्यकीय उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. हे लक्षात घेता, अपघातग्रस्त कामगारांना तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने सर्व कारखान्यांमध्ये हात प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची अद्ययावत माहिती लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे.
हेल्पलाईन क्रमांक: कामगार किंवा व्यवस्थापनाला अपघात घडल्याक्षणी त्वरित संपर्क साधता यावा आणि त्यांना तातडीने पुढील वैद्यकीय दिशा मिळावी, यासाठी एक विशेष 'हेल्पलाईन क्रमांक' जारी करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात प्रायोगिक प्रकल्प: हा उपक्रम सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील उद्योगांमध्ये राबवला जाईल. तेथील यश पाहता, तो संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल.
अधिकारी स्तरावर तातडीने हालचाली
नरिमन भवन येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत मंत्री ॲड. फुंडकर यांनी हे निर्देश दिले. यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. तसेच अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड आणि उपसचिव दीपक पोकळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कामगारांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून, व्यवस्थापनाने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.