पुण्याच्या आयटी पार्कमध्ये खळबळ... नामांकित कंपनी अचानक बंद... ७०० हून अधिक कर्मचारी रस्त्यावर...

Share:
Main Image
Last updated: 29-May-2026

पुणे, (प्रतिनिधी) २९ मे - पुण्यातील आयटी क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी फेज-२ मधील 'गेराज इम्पेरियम राईज' (Gera's Imperium Rise) या इमारतीत कार्यरत असलेली 'थिंक टेक्नॉलॉजी इंडिया' (Think Technology India) ही आयटी कंपनी अचानक बंद झाली आहे. कंपनीने कार्यालय गुंडाळल्यामुळे ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, फ्रेशर्स आणि इंटर्न्स अक्षरशः रस्त्यावर आले असून, त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पगार न मिळणे आणि दिलेले धनादेश (चेक) बाऊन्स झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आश्वासनांची गाजरे आणि अचानक टाळेबंदी!

मिळालेल्या माहितीनुसार, थिंक टेक्नॉलॉजी कंपनीने सन २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केली होती. सुरुवातीला इंटर्न्सना दरमहा १५ हजार रुपये स्टायपेंड वेळेवर दिले जात होते, ज्यामुळे कंपनीबद्दल विश्वास निर्माण झाला. मात्र, २०२६ च्या सुरुवातीपासूनच कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत गेली. दरमहा ७ किंवा ८ तारखेला होणारा पगार फेब्रुवारी २०२६ पासून पूर्णपणे बंद झाला. याबाबत कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि संचालक हर्षल भानुदास ठाकरे यांनी 'कंपनीचे अंतर्गत ऑडिट सुरू आहे' असे सांगत २८ फेब्रुवारीपर्यंत पगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पगार मिळण्याऐवजी कंपनीचे कार्यालयच अचानक बंद झाल्याचे समोर आल्याने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला.

बाऊन्स झालेले धनादेश: कंपनीने पगारासाठी दिलेले धनादेश बँकेत वटलेच नाहीत. यामुळे घरभाडे, बँक ईएमआय आणि दैनंदिन खर्च भागवणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे.

लॅपटॉपच्या नावाखाली वसुली: कंपनीने नोकरीत रुजू करून घेताना प्रत्येक कर्मचाऱ्याकडून लॅपटॉप देण्याच्या नावाखाली १५ हजार रुपयांचे 'सिक्युरिटी डिपॉझिट' घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे.

Advertisement

तरुणांचे आर्थिक शोषण: बाधित कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश तरुण, फ्रेशर्स आणि परजिल्ह्यातून आलेल्या आयटी व्यावसायिकांचा समावेश आहे.

आयटी कर्मचारी संघटना आक्रमक; पोलिसांत धाव

या गंभीर प्रकरणाची दखल 'फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज' (FITE) या संघटनेने घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, "हा आयटी क्षेत्रातील एक मोठा घोटाळा आहे," असा दावा केला आहे. अनेक बाधित कर्मचाऱ्यांच्या मदतीने हिंजवडी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची माहिती थेट कामगार मंत्रालयालाही देण्यात आली आहे. भविष्यात तरुण आयटी प्रोफेशनल्सचे असे आर्थिक शोषण रोखण्यासाठी सरकारने कठोर नियमावली करावी, अशी मागणी FITE कडून करण्यात आली आहे.

व्यवस्थापनाची भूमिका गुलदस्त्यात

७०० कुटुंबांचे भवितव्य अंधारात टाकणाऱ्या या संपूर्ण प्रकरणावर 'थिंक टेक्नॉलॉजी'च्या व्यवस्थापनाकडून किंवा संचालक हर्षल ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, पोलीस या आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीची दखल घेऊन पुढील तपास करत आहेत. आयटी जगतात या घटनेमुळे तीव्र पडसाद उमटत असून, नोकरीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

No comments yet.