सीबीएसईच्या निकालांनंतरच्या तांत्रिक त्रुटींची शिक्षण मंत्र्यांकडून कबुली... आता म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 29-May-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २९ मे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता १२ वीच्या निकालानंतर डिजिटल पोर्टल आणि सर्व्हरमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक समस्यांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथील सीबीएसई मुख्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. "विद्यार्थ्यांचे हित हेच केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत व्यवस्थेच्या आतील किंवा बाहेरील कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही," असा कडक इशारा शिक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला.

या बैठकीला शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग, आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामाकोटी, आयआयटी कानपूरचे संचालक, तसेच एसबीआय, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

'आयआयटी मद्रास' करणार डिजिटल सिस्टीमचे ऑडिट

निकालानंतरच्या सेवांशी संबंधित पोर्टलवर लॉगिन करणे, सर्व्हरवर येणारा प्रचंड ताण आणि शुल्क भरताना (Payment) येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेत या संपूर्ण डिजिटल प्रणालीच्या तांत्रिक परीक्षणाची (Technical Audit) जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास कडे सोपवली आहे. आयआयटी मद्रासचे प्राध्यापक आणि डिजिटल प्रणाली तज्ज्ञांची एक विशेष समिती पोर्टलचे स्थैर्य, सर्व्हरची क्षमता आणि पेमेंट गेटवेच्या त्रुटींवर तातडीने उपाय शोधणार आहे.

१८ लाख विद्यार्थी आणि ४० कोटी स्कॅन केलेली पाने!

बैठकीत शिक्षण मंत्र्यांसमोर सीबीएसईच्या यंदाच्या मूल्यमापन प्रक्रियेची अवाढव्य आकडेवारी सादर करण्यात आली:

Advertisement

एकूण विद्यार्थी: यंदा इयत्ता १२ वीच्या परीक्षेला सुमारे १८ लाख विद्यार्थी बसले होते.

उत्तरपत्रिका: परीक्षा प्रक्रियेत जवळपास ९८ लाख उत्तरपत्रिका आणि तब्बल ४० कोटी स्कॅन केलेल्या पानांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद: आतापर्यंत अंदाजे ४ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या पोर्टलवरून स्वतःच्या ११ लाख स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पाहिल्या आहेत.

पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा

"विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येचे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने निवारण केले जाईल. योग्य असलेल्या सर्व तक्रारींचे प्रभावीपणे आणि जलद गतीने निवारण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. परीक्षा आणि निकालोत्तर यंत्रणा पूर्णपणे उत्तरदायी आणि विद्यार्थी केंद्रित राहील यासाठी शिक्षण मंत्रालय या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे."

— धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री

?s=20

Comments

No comments yet.