अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २८ मे - बकरी ईदच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाजातील युवकांनी एक वेगळा आणि कौतुकास्पद आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ईदच्या नमाजनंतर या युवकांनी थेट गोशाळेत जाऊन गाईंना चारा खाऊ घालत सामाजिक सलोख्याचा नवा संदेश दिला. राज्यात सध्या असलेल्या सामाजिक वातावरणात हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि दिशादर्शक मानला जात आहे.
कुष्ठधाम रोडवरील 'सतनाम साक्षी गोशाळेत' *'आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन'*च्या वतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या काळात अशा सकारात्मक उपक्रमांशिवाय महत्त्वाच्या मुद्द्यांकडे समाजाचे लक्ष वेधले जात नसल्याने, या उपक्रमाचे शहरात मोठे कौतुक होत आहे.
गायीला 'राष्ट्रीय पशू' घोषित करण्याची मागणी
भारत हा कृषीप्रधान देश असून आपल्या संस्कृतीत गाईला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्यात यावे, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याच मागणीला अधिक बळ देण्यासाठी ईदच्या पवित्र दिवशी गोशाळेत जाऊन चारा वाटप करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी सांगितले.
'गोहत्या बंदीच्या नियमांचे पूर्ण पालन'
"राज्य सरकारने लागू केलेल्या गोहत्या बंदीच्या नियमांचे मुस्लिम समाज पूर्ण जबाबदारीने पालन करत आहे. संपूर्ण देशभरात मुस्लिम समाजाने गोवंश जनावरांची कुर्बानी केली जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. गाय ही हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा विषय असून कृषी संस्कृतीचेही प्रतीक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याचा गंभीरपणे विचार करावा," अशी भावना साहेबान जहागीरदार यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या वेळी 'आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन'चे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, मौलाना शफिक कासमी, नगरसेवक हाजी शैबाज, शैबाज बॉक्सर, शहानवाज शेख, फिरोज पठाण, फिरोज आर्किटेक, तनवीर तांबोळी, आयान शेख, मुजम्मिल शेख, शाहिद मोमीन, जीशान शेख, साहिल सय्यद यांच्यासह गोशाळेचे सचिव सीए शंकर अंदानी, मुकेश माधवाणी आणि मोठ्या संख्येने मुस्लिम युवक उपस्थित होते.
एरवी बकरी ईदच्या काळात गोवंश आणि सुरक्षेच्या कारणावरून वेगवेगळ्या चर्चा आणि यंत्रणांची मोहीम सुरू असते; मात्र अशा काळात अहिल्यानगरमध्ये राबवण्यात आलेला हा सलोख्याचा उपक्रम संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.