मुंबई, (प्रतिनिधी) २८ मे - "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे प्रखर विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक आणि तर्कशुद्ध विचार मांडणारे महापुरुष होते. मात्र, आज त्यांच्याच महाराष्ट्रात व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील खोट्या नरेटिव्ह्जवर विश्वास ठेवला जात असून, राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागले आहेत. सावरकरांचा केवळ राजकीय फायद्यासाठी आणि मतांच्या बेगमीसाठी वापर करणाऱ्यांना सावरकर खरोखरच समजले आहेत का?" असा घणाघाती सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना राज ठाकरे यांनी सद्य राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर अत्यंत मर्मभेदी भाष्य केले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचाही समाचार घेताना, त्यांनी महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
सावरकर वाचलेत का? राज ठाकरेंचे थेट प्रश्न:
राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात, सावरकरांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळालेच नाहीत किंवा झेपले नाहीत, हा भाग सोडून द्या. पण सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करू पाहणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का, याबद्दल शंका आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बुद्धीला आणि तर्काला पटते का, हे पाहणारे सावरकर या नेत्यांना खरंच झेपतात का? सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणे मान्य नव्हते. कुठलीही गोष्ट विज्ञान आणि तर्काच्या कसोट्यांवर स्वतः तपासून पाहिली पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.
...म्हणून महाराष्ट्राचे कठीण आहे!
"गेल्या दोन महिन्यांत मी स्वतः दोनवेळा भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न होता, हे मांडले आहे. आपण कोण होतो हेच जर विसरलो, तर पुढे जाण्याचा मार्ग कसा आखणार? यासाठी जर आपण सत्तेला आसुसलेले राजकारणी आणि 'व्हॉट्सॲप विद्यापीठा'वर अवलंबून राहणार असू, तर महाराष्ट्राचे कठीण आहे," अशा शब्दांत राज यांनी चिंता व्यक्त केली.
जातींवरून डोकी फोडणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचे खतपाणी!
सावरकरांच्या विचारांचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, सावरकर प्रखर हिंदू धर्मीय होते, पण धर्मातील त्रुटींवर बोट ठेवताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. त्यांनी जाती अंताचा लढा दिला. दुर्दैवाने, आज त्याच महाराष्ट्रात सावरकरांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणे सुरू आहे आणि जातींवरून डोकी फोडली जात आहेत. विशेष म्हणजे, या सगळ्याला सत्तेत बसलेले लोकच खतपाणी घालत आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केला.
तर्काच्या कसोटीवर तपासणे हीच खरी श्रद्धांजली!
सध्या महाराष्ट्रातील जनतेला उत्सव आणि डीजे संस्कृतीमध्ये गुंतवून ठेवले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपण कोण होतो हे ओळखून, आपल्या परंपरेतले उत्तम ते स्वीकारणे आणि प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणे हेच सावरकरांचे खरे विचार आहेत. हे विचार आचरणात आणणे म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली ठरेल, अन्यथा तो केवळ एक 'उपचार' (औपचारिकता) ठरेल, असे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वीर सावरकरांना अभिवादन केले.