नाशिक, (प्रतिनिधी) २६ मे - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या सर्व विकासकामांच्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने दिले आहेत. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक जारी केले असून, सर्व संबंधित विभाग, कंत्राटदार आणि कार्यान्वयन यंत्रणांना ३१ मे २०२६ पर्यंत कामे पूर्ण करून छायाचित्रांसह अनुपालन (Compliance) अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे.
पावसाळ्यात अडथळे दूर करण्याचे आव्हान
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीअंतर्गत सध्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात रस्ते, ड्रेनेज, घाट, पाणीपुरवठा आणि विविध नागरी सुविधांची मोठी कामे प्रगतीपथावर आहेत. पावसाळ्यात या कामांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्राधिकरणाने ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
कंत्राटदार आणि यंत्रणांसाठी 'हे' नियम बंधनकारक:
साहित्य हटवणे: बांधकाम साहित्य, माती, स्क्रॅप व ढिगारे तातडीने हटवणे किंवा सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक आहे. रस्त्यांवर किंवा वाहतुकीच्या मार्गांवर मुरूम, माती राहणार नाही, याची खात्री करावी लागेल.
बॅरिकेडिंग व प्रकाशयोजना: खोदकाम व ट्रेंचिंग केलेल्या भागांभोवती मजबूत बॅरिकेडिंग, रात्री चमकणारे रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह टेप्स, साइनबोर्ड आणि पुरेशी प्रकाशयोजना करणे बंधनकारक आहे.
जलनिचरा व्यवस्था: कामांच्या परिसरातील नाले, पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या आणि क्रॉस ड्रेनेज व्यवस्था तातडीने स्वच्छ करावी लागणार आहे. नाल्यांलगत वाढलेली झाडाझुडपे हटवून पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.
डी-वॉटरिंग पंप व आपत्कालीन वाहने: पूरप्रवण भागांमध्ये उच्च क्षमतेचे डी-वॉटरिंग पंप पूर्वतयारीत ठेवावे लागतील. प्रत्येक कंत्राटदाराला आपत्कालीन प्रतिसाद वाहन आणि पर्यवेक्षक नियुक्त ठेवावा लागेल.
विद्युत सुरक्षा: सर्व विद्युत यंत्रणा व वायरिंग वॉटरप्रूफ करून सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती: पूरस्थिती समन्वयासाठी प्रत्येक कंत्राटदार आणि कार्यान्वयन यंत्रणेला स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करणे अनिवार्य आहे.
"नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता" - शेखर सिंह
या संदर्भात नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू असली, तरी विकासकामांच्या ठिकाणी पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यालाच प्राधिकरणाचे पहिले प्राधान्य आहे. प्रत्येक यंत्रणेसाठी हे सुरक्षा निकष बंधनकारक असून, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बाधित होता कामा नये, असे आयुक्त शेखर सिंह यांनी ठणकावून सांगितले आहे.