पुणे, (प्रतिनिधी) २५ मे - तामीळनाडूतील कोईम्बतूरमधील सुलूर भागात एका १० वर्षांच्या निष्पाप बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या संवेदनशील घटनेची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चक्क वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आणि त्यांचे सहकारी हसत खिदळत असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या 'हसऱ्या' पोलिसांच्या संवेदनशून्यतेवर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेत पोलिसांची दुखरी नस पकडली आहे.
नेमका काय आहे वादग्रस्त व्हिडिओ?
बालीकेच्या हत्येप्रकरणी कोईम्बतूरच्या पश्चिम क्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक (आयजी) आर. व्ही. रम्या भारती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही परिषद अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी किंवा ऑफ-कॅमेरा असलेल्या एका क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला. यामध्ये वरिष्ठ महिला अधिकारी आणि त्यांचे सहकारी अत्यंत गंभीर विषयाची पार्श्वभूमी असतानाही हसताना दिसत आहेत. या देश हादरवणाऱ्या घटनेत पोलिसांना गांभीर्य नाही का, असा सवाल करत नागरिकांनी तामीळनाडू पोलिसांना धारेवर धरले आहे.
पोलीस महानिरीक्षकांचा खुलासा; स्पष्टीकरणावरही आक्षेप
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी पुन्हा आयजी रम्या भारती यांना गाठून जाब विचारला. त्यावर त्यांनी सांगितले की,
"हा व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला जात आहे. अधिकृत माहिती वाचताना सर्व अधिकारी पूर्णपणे गंभीर होते, मात्र ऑफ-कॅमेरा काहीतरी वेगळी चर्चा किंवा घटना घडल्यामुळे तो हसतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा या दुर्दैवी घटनेशी संबंध नव्हता. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुख्य आरोपीला अटक करून कठोर कारवाई सुरू केली आहे."
मात्र, हा खुलासा करतानाही त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत असल्याने, त्यांनी हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला नसल्याची टीका होत आहे.
पोलिसांनी हसूच नये का? वेळ आणि भान चुकले!
पोलीस देखील माणूस आहेत, त्यांनाही सुख-दुःख आणि भावना आहेत. साहजिकच त्यांच्याही मनात या घटनेबद्दल माणूस म्हणून वेदना असतील. परंतु, प्रश्न त्यांच्या हसण्याचा नसून 'वेळ, प्रसंग आणि ठिकाण' चुकल्याचा आहे. जेव्हा एखादी अशी संवेदनशील घटना घडते, तेव्हा संपूर्ण समाज दुःखात असतो आणि जनतेचा पहिला रोष पोलिसांवर असतो. अशा वेळी समोर कॅमेरे आणि मीडिया असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक भान राखणे आणि संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित होते, जे येथे घडले नाही.
पीडित कुटुंबाच्या जखमेवर मीठ; मुख्यमंत्र्यांकडे लक्ष
आरोपींना २४ तासांत पकडणे ही पोलिसांची जमेची बाजू ठरली असली, तरी एका महिला अधिकाऱ्याच्या या बेफिकीर हसण्यामुळे पीडित कुटुंबाच्या मनाला अधिक जखमा झाल्या आहेत. तामीळनाडूमध्ये नुकतेच सत्तेवर आलेले नवे मुख्यमंत्री विजय थलापती या गंभीर प्रकारावर आणि पोलिसांच्या या भूमिकेवर काय प्रतिक्रिया देतात आणि काय कारवाई करतात, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.