स्वप्नांच्या पलीकडची भरारी... सुरगाण्याच्या दुर्गम भागातील 'झेडपी'चे चिमुकले पोहोचले थेट 'वानखेडे'वर...

Share:
Main Image
Last updated: 25-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ मे - "परिस्थिती कितीही दुर्गम असली, तरी प्रयत्नांना जर योग्य संधीची साथ मिळाली, तर आभाळही ठेंगणे वाटते!" याचाच प्रत्यय नुकताच नाशिककरांना आला. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा सारख्या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातबाभळ येथील विद्यार्थ्यांना आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. ज्या मुलांनी क्रिकेट आजवर फक्त टीव्हीवर पाहिले किंवा रेडिओवर ऐकले होते, ती मुले थेट मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर पोहोचली. दिव्य फाउंडेशन (नाशिक) आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यार्थ्यांना आयपीएलमधील 'मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स' हा रोमांचक सामना प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली.

पुस्तकी ज्ञानापलीकडचा जगाचा अनुभव
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभवांची शिदोरी मिळावी आणि त्यांनी पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन जगाचा अनुभव घ्यावा, या उद्देशाने शाळेतील शिक्षक कुसुम राऊत व खंडू मोरे सर यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, स्टेडियममधील चकाचक दिवे, प्रेक्षकांचा कानठळ्या बसवणारा जल्लोष आणि लाडक्या खेळाडूंना डोळ्यांसमोर पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो शब्दांत मांडणे कठीण आहे. या एका छोट्या प्रयत्नाने दुर्गम भागातील या मुलांच्या स्वप्नांना नवे पंख दिले आहेत.

Advertisement

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठीवर कौतुकाची थाप
या अनोख्या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी विद्यार्थ्यांना विशेष शुभेच्छा दिल्या. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी नाशिक येथे स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना खाऊचे वाटप करून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, सुरगाणा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अल्फा देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी, केंद्रप्रमुख पंडित पवार आणि सहाय्यक केंद्रप्रमुख विनायक चौधरी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

संस्थांचे मानले आभार
दुर्गम भागातील चिमुकल्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा सातबाभळ परिवारातर्फे दिव्य फाउंडेशन नाशिकच्या सर्व सदस्यांचे आणि रिलायन्स फाउंडेशनचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले आहेत. 'बदलूया आयुष्य, घडवूया भविष्य' हा संदेश देत या मुलांनी मुंबईहून आपल्या गावाकडे परतीचा प्रवास केला, मात्र त्यांच्या डोळ्यांत आता मोठ्या स्वप्नांची नवी चमक पाहायला मिळत आहे.

Comments

No comments yet.