मुंबई, (प्रतिनिधी) २५ मे - गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना आज (२५ मे) जारी करण्यात आली असून, १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी महायुतीत जागावाटपाच्या खलबतांना वेग आला असून, अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार जागावाटपाचा एक नवा फॉर्म्युला समोर आला आहे.
महायुतीचा नवा जागा फॉर्म्युला काय?
विधान परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीमधील जागावाटपाचे समीकरण बदलल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप १२, शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १ अशा जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी २ जागांवर लढणार अशी चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिल्ली दौरा करत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेने आपल्या पारंपरिक जागा राखण्यात यश मिळवले असून त्यांच्या वाट्याला ४ जागा येण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला केवळ एकच जागा येण्याची चिन्हे आहेत.
कोणती जागा कोणाच्या पदरात पडणार?
शिवसेना (४ जागा): ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली. (हिंगोली-परभणीची जागा शिवसेनाच लढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.)
राष्ट्रवादी काँग्रेस (१ जागा): रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची महत्त्वाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते.
भाजप (१२ जागा): पुणे मतदारसंघावर भाजपने आपला दावा कायम ठेवला असून, इतर ११ जागांवरही भाजपचे उमेदवार असणार आहेत.
या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे.
अडीच वर्षांनंतर का होतेय निवडणूक?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिका, जिल्हा परिषदा) निवडणुका वेळेत न झाल्यामुळे, पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपूनही या जागा रिक्त होत्या. नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण मतदार संख्येच्या किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असतील तरच ही निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून दिले जातात.
या पार्श्वभूमीवर सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक आणि अमरावती या जागांसाठी हा राजकीय रणसंग्राम रंगणार आहे.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक:
निवडणुकीची अधिसूचना- 25 मेअर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जूनउमेदवारी अर्जांची छाननी- 2 जूनअर्ज माघारीची मुदत- 4 जून मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)मतमोजणी- 22 जून