नाशिक, (प्रतिनिधी) २२ मे - दोन भावंडांमधील किरकोळ वादावरून पालकांनी रागवल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने घर सोडल्याची धक्कादायक घटना मखमलाबाद येथील मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रोडवरील बोराडे मळा भागात घडली आहे. गेल्या पाच दिवसांपासून या मुलाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. त्याला कोणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावंडांच्या वादातून आई-वडील रागवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी (दि. १७ मे) दुपारच्या सुमारास बोराडे मळा भागात राहणाऱ्या या कुटुंबातील थोरला अल्पवयीन मुलगा आणि त्याचा लहान भाऊ यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद वाढल्याने आई-वडिलांनी दोघांनाही समजावत कडक शब्दांत रागावले. मात्र, आई-वडील केवळ आपल्यालाच टोकतात आणि लहान भावाची बाजू घेतात, असा गैरसमज थोरल्या मुलाने करून घेतला.
बहिणीला सांगितले, 'क्रिकेट बघायला जातो'
आई-वडिलांच्या बोलण्याचा राग मनात धरून या मुलाने घर सोडण्याचा निर्णय घेतला. घराबाहेर पडताना त्याने आपल्या बहिणीला 'मी क्रिकेट मॅच बघण्यासाठी जात आहे' असे सांगितले. मात्र, रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. नातेवाईक, मित्र आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही त्याचा कुठेही सुगावा लागला नाही.
अखेर पाच दिवस उलटूनही मुलगा घरी न आल्याने आणि त्याचा कोणताही संपर्क न झाल्याने घाबरलेल्या पालकांनी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले. मुलाचे वय अल्पवयीन असल्याने आणि त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असावे, अशी भीती पालकांनी व्यक्त केल्याने पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलाचा शोध घेतला जात आहे.