देशात पहिल्यांदाच ही प्रणाली थेट नाशिक-मुंबईत... ग्रामपंचायतीच्या परिघात मिळणार अचूक हवामान पूर्वसूचना...

Share:
Main Image
Last updated: 21-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ मे - हवामानातील बदल, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशात सर्वात मोठी झेप घेतली आहे. केंद्र सरकारच्या 'मिशन मौसम' अंतर्गत विकसित करण्यात आलेली अत्याधुनिक आणि स्वदेशी ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ (BharatFS) चा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) पुण्यातील नामांकित 'भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था' (IITM) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील आपत्तीची तयारी आणि प्रशासकीय प्रतिसाद यामध्ये क्रांतीकारी सुधारणा होणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.

आता तालुका आणि थेट ग्रामपंचायत स्तरावर लक्ष!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला असून, ही प्रणाली राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्र (SEOC) आणि भू-स्थानिक निर्णय सहाय्य प्रणाली (GeoDSS) यांच्या माध्यमातून थेट जोडली जाईल.

सूक्ष्म पातळीवर अंदाज: आतापर्यंत १२ किमी × १२ किमी क्षेत्राचे अंदाज उपलब्ध होत होते. मात्र, आता ‘भारत फोरकास्ट सिस्टम’मुळे ६ किमी × ६ किमी या अत्यंत सूक्ष्म आणि उच्च दर्जाच्या क्षेत्राचा हवामान अंदाज मिळणार आहे. यामुळे उपतालुका आणि थेट ग्रामपंचायत स्तरापर्यंतची अचूक माहिती प्रशासनाला मिळेल.

दर तीन तासांनी अपडेट: हवामानासंबंधीची माहिती आता दर तीन तासांनी अद्ययावत (Update) केली जाईल. यात पर्जन्यमान, कमाल-किमान तापमान, वाऱ्याचा वेग व दिशा, वातावरणीय दाब आणि ढगांचे प्रमाण याची 'रिअल टाईम' माहिती उपलब्ध असेल.

सायरन आणि मोबाईल संदेशाद्वारे नागरिकांना अलर्ट

या अत्याधुनिक प्रणालीचा थेट फायदा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे. उष्णतेची लाट (हिट वेव्ह), मुसळधार पाऊस, ढगफुटी, वीज पडणे, वादळ, पूर आणि भूस्खलन यांसारख्या आपत्तींची पूर्वकल्पना आता वेगाने मिळणार आहे.

नागरिकांपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी स्वयंचलित अलर्ट प्रणाली, सायरन, मोबाईल संदेश (SMS) आणि सार्वजनिक प्रसारमाध्यमांचा एकाच वेळी वापर केला जाईल. यामुळे आपत्ती येण्यापूर्वीच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे प्रशासनाला सहज शक्य होणार आहे.

Advertisement

निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान होणार! > "या जागतिक दर्जाच्या सहकार्यामुळे राज्य आणि जिल्हा पातळीवरील निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक माहितीवर आधारित होईल. पूर्वसूचना प्रणाली अधिक प्रभावी बनवून शेवटच्या घटकातील नागरिकांपर्यंत वेळेत मदत व इशारे पोहोचवणे सुलभ होईल."

- विनीता सिंगल, प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग)

आपत्कालीन मदतीसाठी 'हे' क्रमांक जारी

वैज्ञानिक हवामान माहिती थेट जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांच्या हातात पोहोचणार असल्याने नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट होईल, असा विश्वास SDMA चे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. प्रशासनाने नागरिकांना खालील अधिकृत आपत्कालीन क्रमांकांची माहिती दिली आहे:

राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (SDMA): १०७०

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष (DDMA): १०७७

रुग्णवाहिका व वैद्यकीय आपत्कालीन सेवा: १०८

?s=20

Comments

No comments yet.