मुंबई, (प्रतिनिधी) २१ मे - केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांची निवडणूक जाहीर करताच, सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कोणत्या जागेवर नेमका कोणाचा हक्क, यावरून वरिष्ठ पातळीवर मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय संख्याबळाच्या आधारे जागावाटपाचा एक प्राथमिक फॉर्म्युला (Formula) समोर आला असून, त्यानुसार महायुतीत भाजपचा मोठा वरचष्मा राहणार असल्याचे चिन्हे आहेत.
संख्याबळाच्या सूत्रावरून भाजपला १२ जागा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान नगरसेवक आणि सदस्यांच्या संख्याबळावर महायुतीत प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाचा त्या जागेवर दावा, असे ढोबळ सूत्र ठरवण्यात आले आहे. या सूत्रानुसार:
भारतीय जनता पक्ष (BJP): १२ जागा
शिवसेना (शिंदे गट): ०३ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ०२ जागा
असे प्राथमिक चित्र असले, तरी महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अधिक जागांच्या मागणीला पूर्ण पाठबळ देण्यास भाजप सध्या तरी उत्सुक नसल्याचे समजते.
कोकण आणि पुण्याच्या जागेवरून चुरस वाढली!
या निवडणुकीत विशेषतः कोकण स्थानिक स्वराज्य संस्था (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्था या दोन जागांवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये उमेदवारीवरून उघड चढाओढ सुरू झाली आहे. या जागांवरून नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असल्याने महायुतीसमोर पेच वाढला आहे.
कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?
पक्ष दावा असलेल्या जागा / मतदारसंघ
भाजपा (१२ जागा) नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड, सोलापूर.
शिवसेना (०३ जागा) ठाणे, नाशिक, यवतमाळ.
राष्ट्रवादी काँग्रेस (०२ जागा) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हिंगोली-परभणी.
जागांची अदलाबदल होण्याची शक्यता; आठवड्याभरात निर्णय
हा केवळ प्राथमिक चर्चेतील फॉर्म्युला असून, अंतिम निर्णयापूर्वी महायुतीच्या समन्वय समितीमध्ये यावर सविस्तर खल होणार आहे. काही पारंपारिक आणि प्रतिष्ठेच्या जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जागांची अदलाबदल (Adjusment) होण्याची दाट शक्यता आहे.
अंतिम शिक्कामोर्तब मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत
जागावाटपाच्या या प्राथमिक मसुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार) यांच्या आगामी उच्चस्तरीय बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. दोन्ही मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊन येत्या आठवड्याभरात जागावाटपावर महायुतीत एकमत घडवून आणण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत.