पीक विमा कंपन्या, बोगस बियाणे आणि खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर... खरीप नियोजनासाठी कडक पवित्रा...

Share:
Main Image
Last updated: 15-May-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १५ मे - आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिकता न करता थेट फौजदारी कारवाई करावी, असे कडक निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते.

बोगसगिरीला चाप बसणार; तपासणी नाके तैनात

राज्याबाहेरून, विशेषतः सीमावर्ती भागातून येणाऱ्या बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात विशेष तपासणी नाके उभारले जाणार आहेत. कापूस, सोयाबीन आणि ज्वारीच्या बियाण्यांच्या फसवणुकीची गंभीर दखल घेत अनधिकृत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

खते आणि पीक विम्याबाबत कडक भूमिका

पालकमंत्री म्हणाले की, "शेतकऱ्यांना खतांची सक्तीची जोडविक्री (Linking) करणाऱ्या आणि निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या केंद्रांवर गुन्हे दाखल करा. तसेच, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास त्यांच्यावरही फौजदारी कारवाई करण्यात येईल." यावेळी त्यांनी 'नॅनो युरिया' आणि 'नॅनो डीएपी'च्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही केल्या.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची माहिती:

Advertisement

बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले की, जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार तपासण्या पूर्ण झाल्या असून १०३ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्हा पीएमएफएमई योजना आणि कृषी यांत्रिकीकरणात राज्यात आघाडीवर असून, सद्यस्थितीत खतांचा पुरेसा राखीव साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:

मोफत वाहतूक: खत कंपन्यांकडून १०० किमीपर्यंत मिळणाऱ्या मोफत वाहतूक सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणार.

तंत्रज्ञानाचा वापर: गावपातळीवर व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे हवामान आणि कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणार.

पुरस्कार: नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेमार्फत गौरव होणार.

या बैठकीला आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांसह कृषी आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी कृषी विभागाच्या विविध माहितीपुस्तिकांचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

?s=20

Comments

No comments yet.