पत्नी आणि दोन चिमुरड्यांना जिवंत जाळणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा... नाशिक कोर्टाचा निकाल...

Share:
Main Image
Last updated: 15-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ मे - पंचवटी परिसरात सहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका अमानवीय गुंन्ह्यात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन चिमुरड्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळणाऱ्या जलालउद्दीन अलीमोहोम्मद मलिक ऊर्फ खान साहेब याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

काय होते प्रकरण?

ही घटना ६ ऑगस्ट २०१८ रोजी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास पंचवटीतील कालिका नगर भागात घडली होती. आरोपी जलालउद्दीन याने फिर्यादी संगिता सुरेश देवरे हिच्याशी वाद घातला आणि "तुला आणि तुझ्या परिवाराला जिवंत जाळीन" अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने घरात झोपलेल्या संगिता देवरे (३८), त्यांची मुलगी प्रिती (२०) आणि ९ महिन्यांची नात सिद्धी यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना आग लावून दिली. या भीषण घटनेत तिघींचाही होरपळून मृत्यू झाला होता.

Advertisement

न्यायालयाचा कठोर निकाल

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. भन्साळी यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आणि पोलिसांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.

तपास पथकाचे कौतुक

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि त्यांच्या पथकाने अत्यंत चिकाटीने केला होता. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे तसेच सरकारी अभियोक्ता श्रीमती लीना चव्हाण व अनिल बागले यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet.