महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेशावर उत्तर भारतीयांचा डोळा? राज ठाकरेंनी मांडले 'NEET' मागचे गौडबंगाल...

Share:
Main Image
Last updated: 14-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ मे - देशभरात गाजत असलेल्या 'NEET' पेपरफुटी प्रकरणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त करत, या सडलेल्या व्यवस्थेतून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांच्या हातात आपण आरोग्य देणार का? असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे.

'NEET' म्हणजे उत्तरेकडील विद्यार्थ्यांसाठी पायघड्या

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, २०१६ मध्ये 'NEET' लादण्याची गरजच नव्हती. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मेडिकल कॉलेजेसची संख्या जास्त आहे. ही व्यवस्था मोडीत काढून उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना दक्षिण आणि महाराष्ट्रात घुसवण्यासाठीच हा अट्टाहास सुरू आहे. महागडे कोचिंग क्लासेस लावून आर्थिक शक्तीच्या जोरावर निकाल वाकवले जात आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Advertisement

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात 'NEET' मध्ये वारंवार घोळ झाले आहेत. "इतके घोळ होऊनही हे महाशय पदाला चिकटून का बसले आहेत? केवळ हिंदी लादण्याचा अजेंडा राबवत आहेत म्हणून त्यांना ही बक्षिसी दिली आहे का?" असा सवाल करत राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारला 'पाठीचा कणा' ताठ करण्याचा सल्ला

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, "पेट्रोल-डिझेल वाचवण्याचे फोटोसेशन करण्यापेक्षा राज्याच्या हिताची ठाम भूमिका घ्या. दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळून 'NEET' ला विरोध करा." महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये जर इथल्या मराठी मुलांना प्रवेश मिळणार नसेल, तर सरकारचा उपयोग काय? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

?s=20

Comments

No comments yet.