लासलगाव शहर आणि रेल्वे गेट मध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न संपणार... माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश...

Share:
Main Image
Last updated: 12-May-2026

लासलगाव, (प्रतिनिधी) १२ मे - लासलगाव येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ११० कोटी रुपये निधीतून लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम करण्यात येत आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांचा पाठपुरावा आणि समन्वयातून या रस्त्याचे काम अंतिम टप्यात असून पुढील पंधरा दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण होऊन लवकरच येथून वाहतूक सुरू होणार आहे. या बाह्यवळण रस्त्यामुळे लासलगाव शहर आणि रेल्वे गेट येथे होणारी वाहतुकीची कोंडी कायमची सुटणार असून या परिसरातील दळणवळण सुरळीत होणार आहे.

लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेत राज्यासह परराज्यातील अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी याठिकाणी असलेल्या रेल्वे गेट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागत होता. याबाबत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव रेल्वे उड्डाणपुल आणि पोहोच रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. त्याचप्रमाणे लासलगाव शहर बाह्यवळण रस्त्याचे काम मंजूर करून घेतले.या ठिकाणी भव्य दिव्य रेल्वे उड्डाणपूल देखील साकारण्यात आला. मात्र टाकळी विंचूर व विंचूर परिसरातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित होता. तसेच या परिसरातील जागेचा कायदेशीर पेच असल्याने या रस्त्याचे काम बंद पडले होते. 

मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार माजी खासदार समीर भुजबळ यांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात विशेष लक्ष घालून शेतकरी आणि प्रशासन यांच्यात समन्वय घडवून आणला. वारंवार शेतकरी आणि प्रशासन यांच्या बैठका घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला. तसेच टाकळी विंचूर परिसरात जमिनीबाबत कायदेशीर पेच असल्याने ॲड.उत्तम कदम यांच्या विशेष सहकार्यातून हा पेच सोडवून भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लावण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत टाकळी विंचूर बाजूच्या संपूर्ण रस्त्याचे काम हे पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर विंचूर भागातील राहिलेले भूसंपादन आणि रस्त्याचे उर्वरित काम पुढील पंधरा दिवसात पूर्ण होऊन रस्ता वर्दळीस सुरू होऊ शकणार आहे.

Advertisement

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ४.८०० मीटर हा लासलगाव बाह्य वळण रस्ता असून यासाठी रेल्वे उड्डाणपूल देखील साकारण्यात आला आहे. भूसंपादनासह ११० कोटी रुपये निधीतून या रस्त्याची विकासकामे करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होताच हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. यामुळे लासलगाव रेल्वे स्थानक व शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर होणार असून दळणवळण अधिक सुरळीत होणार आहे. यामुळे लासलगाव परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया.....

लासलगाव शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव बाह्य वळण रस्ता साकारण्यात येत आहे. भूसंपादनातील कायदेशीर बाबी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी असल्याने हे काम प्रलंबित राहिले होते. शेतकरी व प्रशासन यांच्यात समन्वय साधून वारंवार बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात आला.ॲड.उत्तम कदम यांच्या सहकार्याने भूसंपादनाचा कायदेशीर पेच दूर करण्यात आला. ॲड.उत्तम कदम आणि शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे त्यांचे मनापासुन धन्यवाद.

माजी खासदार समीर भुजबळ

Comments

No comments yet.