कायद्याला केराची टोपली... फोनवरच पत्नीला दिला तिहेरी तलाक... मारहाणीत गर्भपातही घडविला...

Share:
Main Image
Last updated: 10-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० मे - देशात 'तिहेरी तलाक' ही प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवण्यात आली असतानाही, नाशिक शहरात या प्रथेचा जाच अद्यापही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून, तिला अमानुष मारहाण करत गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या एका संशयित पतीविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहानंतर छळाला सुरुवात
संशयित मलिक अशरफ समशेर (२८, रा. पखाल रोड) हा दिंडोरीतील जऊळके येथे भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने पीडितेशी फेब्रुवारी २०२२ मध्ये रीतसर नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. विवाहानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू असताना, समशेरने शुल्लक कारणावरून पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली.

Advertisement

मारहाणीत बाळाचा मृत्यू अन् फोनवर तलाक
जानेवारी २०२५ मध्ये संशयिताने पीडितेला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा फटका इतका गंभीर होता की, पीडितेच्या पोटातील वाढणाऱ्या भ्रूणाचा मृत्यू झाला. या क्रूरतेनंतर ३० जानेवारी २०२६ रोजी मलिकने पीडितेला फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. "आज से तू हलाल नही हराम हो गई... मी शुद्धीत बोलत आहे, तलाक, तलाक, तलाक" असे म्हणत त्याने बेकायदेशीररीत्या काडीमोड दिला आणि हा संवाद रेकॉर्ड केल्याची धमकीही दिली.

पोलीस आयुक्तांची गंभीर दखल
पीडितेने या त्रासाला कंटाळून शुक्रवारी (८ मे) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. आयुक्तांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मुंबई नाका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण) कायदा २०१९ च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet.