नाशिक, (प्रतिनिधी) ९ मे - नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील सीएनजी (CNG) वाहनधारकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपया ५० पैशांची वाढ जाहीर केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले असून, यामुळे रिक्षाचालक आणि खासगी वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
काय आहेत नवे दर?
दरवाढीनंतर नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजीचा किरकोळ विक्री दर आता ९५ रुपये १५ पैसे प्रतिकिलो इतका झाला आहे. गेल्या काही काळातील ही वाढ पाहता इंधनाचे दर शंभरीच्या दिशेने सरकत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
वाहनधारकांचा संताप: 'दर वाढतात, पण सुविधा कुठे?'
केवळ दरवाढीमुळेच नव्हे, तर सीएनजी पुरवठ्याबाबत असलेल्या समस्यांमुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. वाहनधारकांनी खालील प्रश्न उपस्थित केले आहेत:
रांगाच रांगा: सीएनजी भरण्यासाठी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, ज्यामुळे तासनतास प्रतीक्षा करावी लागते.
अपपुरा पुरवठा: अनेकदा गॅसचा मुबलक पुरवठा होत नसल्याने प्रवाशांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.
पंपांची कमतरता: वाहनांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत नवीन सीएनजी पंपांची संख्या वाढत नसल्याने यंत्रणेवर ताण येत आहे.
"एककीडे गॅस मिळत नाही आणि तासनतास रांगेत उभे राहावे लागते, तर दुसरीकडे कंपनीकडून सातत्याने दरवाढ केली जात आहे," अशा शब्दांत त्रस्त वाहनधारकांनी आपली भावना व्यक्त केली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार असल्याने महागाईत अधिक भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.