विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे... पहिला नंबर या संस्थेचा...

Share:
Main Image
Last updated: 08-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) ८ मे - "विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच खपवून घेतले जाणार नाही," अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी बोगस शिक्षण संस्थांना इशारा दिला आहे. मुंबईतील वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयातील फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेत, दोषी संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?

वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता नसलेला वास्तुशास्त्र अभ्यासक्रम शिकवून बोगस पदव्या देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर मंत्री पाटील यांनी दोषींवर 'अनधिकृत संस्था व अभ्यासक्रम प्रतिबंध अधिनियम २०१३' अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

फसवणूक झालेल्या १३२ विद्यार्थ्यांना दिलासा

ज्या १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे, त्यांच्या हितासाठी नवीन शैक्षणिक धोरण २०२० (NEP) मधील 'रिकगनिशन प्रायर लर्निंग' (RPL) तरतुदीचा वापर करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने यावर अभ्यास करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

प्रवेशापूर्वी सतर्क राहण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी खालील गोष्टींची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे:

संस्थेला सक्षम प्राधिकरणाची (UGC/AICTE) मान्यता आहे का?

उच्च शिक्षण किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर संस्थेचे नाव तपासावे.

केवळ जाहिरातींना किंवा भूलथापांना बळी पडू नये.

भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी विभागाने एक विशेष कार्यप्रणाली (SOP) तयार करावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीला विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet.