सावधान... वर्षातून ५ वेळा नियम मोडल्यास... ई-चलन न भरल्यास... वाहनधारकांवर होणार ही कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 08-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ मे - वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना आता मोठा दणका मिळणार आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमातील नवीन बदलानुसार, एखाद्या चालकाने वर्षभरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियम मोडल्यास, त्याचा वाहन चालविण्याचा परवाना (Driving License) निलंबित किंवा कायमचा रद्द केला जाऊ शकतो, अशी माहिती नाशिकच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चलन प्रणाली अधिक पारदर्शक

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार ही नवीन पारदर्शक चलन प्रणाली लागू करण्यात आली आहे. प्रत्यक्ष दंडासोबतच आता इलेक्ट्रॉनिक (ई-चलन) पद्धतीनेही दंड आकारला जाणार आहे. या प्रक्रियेत वाहनधारकांना काही महत्त्वाच्या मुदती देण्यात आल्या आहेत:

४५ दिवसांची मुदत: चलन भरण्यासाठी किंवा त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी ४५ दिवसांचा वेळ मिळेल.

आक्षेप नोंदवणे: जर दंड चुकीचा वाटत असेल, तर ४५ दिवसांत ऑनलाइन पुरावे सादर करून आव्हान देता येईल.

न्यायालयीन अपील: आक्षेप नाकारल्यास पुढील ३० दिवसांत ५० टक्के दंड भरून न्यायालयात अपील करता येईल.

Advertisement

चलन न भरल्यास कठोर कारवाई

विहित मुदतीत दंड न भरल्यास वाहन मालकांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने:

१. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि परवाना (License) संबंधित सर्व सेवा बंद केल्या जातील.

२. वाहनावर 'नॉट टू बी ट्रान्झॅक्टेड' (NTBT) अशी नोंद घेतली जाईल, ज्यामुळे वाहन विकता येणार नाही.

३. थकबाकी जास्त असल्यास वाहन जप्त करण्याची कारवाई देखील होऊ शकते.

आरटीओचे नागरिकांना आवाहन

रस्ते सुरक्षा आणि शिस्त वाढवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आलेले चलन वेळेत भरून कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Comments

No comments yet.