तामिळनाडूत सत्तापेच.. विजय थलपतींना राज्यपालांनी परत पाठवले...

Share:
Main Image
Last updated: 07-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ मे - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित द्रमुक आणि अण्णाद्रमुकला धोबीपछाड देत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षासमोर सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रमुख आणि सुपरस्टार विजय (थलपती) यांचा आज होणारा शपथविधी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या भूमिकेमुळे लांबणीवर पडला असून, तामिळनाडूत राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.

राज्यपालांची 'बहुमताची' अट नियमानुसार सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करणे अपेक्षित असताना, राज्यपाल आर्लेकर यांनी विजय यांना आधी ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्याची अट घातली आहे. "मला तामिळनाडूत स्थिर सरकार हवे आहे, त्यामुळे बहुमत सिद्ध करा आणि मगच शपथ घ्या," अशी ठाम भूमिका राज्यपालांनी घेतल्याने विजय यांना आज दुसऱ्यांदा राजभवनातून रिकाम्या हाती परतावे लागले.

नेहरू स्टेडियमवर हिरमोड विजय यांच्या शपथविधीसाठी चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर जंगी तयारी करण्यात आली होती. मात्र, राज्यपालांच्या निर्णयामुळे हा सोहळा रद्द करावा लागला. यामुळे टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप असून, काही ठिकाणी राजभवनासमोर निषेध व्यक्त करण्यात आला.

Advertisement

संख्याबळाची गोळाबेरीज तामिळनाडूच्या २३४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. सध्याचे चित्र खालीलप्रमाणे आहे: टीव्हीके: १०८ जागा (विजय दोन ठिकाणी निवडून आल्याने प्रत्यक्ष १०७ मोजले जाण्याची शक्यता) काँग्रेस: ५ जागा (टीव्हीकेला पाठिंबा) एकूण पाठिंबा: ११३ जागा बहुमतासाठी विजय यांना अजूनही ५ ते ८ जागांची आवश्यकता आहे.

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा तामिळनाडूतील या घडामोडींवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी न बोलावणे हा खोटारडेपणा आहे. भाजपमध्ये सगळेच 'कोश्यारी' झाले आहेत, कोणी धोतरात आहे तर कोणी सुटाबुटात," अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली.

आता विजय थलपती हे आवश्यक पाच आमदारांचा पाठिंबा कसा मिळवतात आणि तामिळनाडूत कुणाचे सरकार स्थापन होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

?s=20

Comments

No comments yet.