नाशिक, (प्रतिनिधी) ३० एप्रिल - प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबा यांचा नाशिकमध्ये येत्या २ मे रोजी होणारा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. धीरेंद्र शास्त्री हे चमत्काराचे दावे करून अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करत असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात 'अंनिस'च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.
महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप
निवेदनात म्हटले आहे की, धीरेंद्र शास्त्री हे धार्मिक प्रवचनाच्या नावाखाली महाराष्ट्रात येतात आणि संत तुकाराम महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अपशब्द वापरतात. हा केवळ महापुरुषांचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यताही अंनिसने वर्तवली आहे.
'तो' चमत्कार सिद्ध करा, २१ लाख जिंका!
धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या मनातील प्रश्न ओळखण्याचा आणि त्याचे दैवी उत्तर देण्याचा दावा करतात. हा दावा वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत असून जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे. अंनिसने त्यांना पुन्हा एकदा जाहीर आव्हान दिले आहे:
आव्हान: अंनिसने दिलेल्या १० व्यक्तींच्या मनातील प्रश्न ओळखावेत आणि त्यांचे नाव, गाव, पत्ता सांगावा.
अटी: हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक सभेऐवजी शासकीय अधिकारी, तज्ज्ञ आणि पत्रकारांच्या उपस्थितीत चाचणी द्यावी.
पारितोषिक: हा चमत्कार विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध केल्यास २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
आंदोलनाचा इशारा
जर प्रशासनाने या भोंदूबुवांचा कार्यक्रम रद्द केला नाही, तर 'अंनिस' आणि इतर समविचारी संघटना लोकशाही मार्गाने आणि शांततेने आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि महेंद्र दातरंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.