शिंदे गटाचे मंत्री सरनाईक यांनी जागा हडपली... भाजप आमदार नरेंद्र मेहता थेट पोलीस ठाण्यात...

Share:
Main Image
Last updated: 27-Apr-2026

ठाणे, (प्रतिनिधी) २७ एप्रिल - राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरू झालेली ही जुगलबंदी आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समर्थकांवर भाईंदरपाडा येथील भूमिपुत्रांची जागा हडपल्याचा खळबळजनक आरोप करत थेट कासारवडवली पोलीस ठाणे गाठल्याने मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवडवली परिसरातील भाईंदरपाडा येथील भूमिपुत्र असलेल्या भोईर कुटुंबाच्या मालकीची सुमारे १,२१९ चौरस मीटर जमीन बळकावण्यात आल्याचा दावा नरेंद्र मेहता यांनी केला आहे. भोईर कुटुंबाची एकूण २,४३९ चौरस मीटर जागा असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक जागेवर अतिक्रमण करून ती बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप मेहतांनी केला आहे. या प्रकरणी भोईर कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी मेहता यांनी आज आपले कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि महापौरांसह पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी

आमदार नरेंद्र मेहता यांनी संबंधित जागेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "सत्तेचा गैरवापर करून गरिबांच्या आणि भूमिपुत्रांच्या जमिनी लाटण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी." मेहता यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.

Advertisement

पुत्र पुर्वेश सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता: पत्राने पेटवला वाद

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मेहता यांनी “प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते” असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा समाचार घेत प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनी मेहतांना पत्र लिहून जोरदार टीका केली होती. "राजकारणात मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक टीका करताना सभ्यता आणि मर्यादा पाळणे आवश्यक आहे," असे पुर्वेश यांनी ठणकावून सांगितले होते. या पत्रयुद्धानंतर उभय नेत्यांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, त्याचे पडसाद आता जमिनीच्या वादात उमटताना दिसत आहेत.

चौकशी सेलचे प्रत्युत्तर?

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात नरेंद्र मेहता यांच्या विरोधात जमीन हडपल्याच्या अनेक तक्रारी आल्याचा दावा केला होता. या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक विशेष 'चौकशी सेल' नेमणार असल्याचेही सरनाईकांनी जाहीर केले होते. सरनाईकांच्या या पवित्र्यानंतर आता मेहतांनी थेट सरनाईकांवरच पलटवार केल्याने मिरा-भाईंदरच्या राजकारणात एकमेकांविरुद्ध 'चेक अँड मेट'चे राजकारण सुरू झाले आहे.

आता या गंभीर आरोपांनंतर मंत्री प्रताप सरनाईक नेमकी काय भूमिका घेतात आणि पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.