"शाळेतले आणि तुम्ही सांगता ते शिवाजी महाराज वेगळे का?"... लेकीच्या प्रश्नावर सत्यजित तांबे यांचे जबरदस्त उत्तर

Share:
Main Image
Last updated: 26-Apr-2026

संगमनेर, (प्रतिनिधी) २६ एप्रिल - "बाबा, तुम्ही सांगता ते आणि शाळेत शिकवतात ते शिवाजी महाराज वेगळे का वाटतात?" आमदार सत्यजित तांबे यांची मुलगी अहिल्या हिने विचारलेल्या या साध्या पण तितक्याच सखोल प्रश्नाने सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे. आमदार तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेले हे विचार सध्या तुफान व्हायरल होत असून, त्यांनी यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या आणि समावेशक विचारांची मांडणी केली आहे.

संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

आमदार तांबे यांनी आपल्या पोस्टची सुरुवातच आमदार संजय गायकवाड यांच्या अलीकडील वादग्रस्त विधानाचा संदर्भ देऊन केली. "चुकीच्या पद्धतीने का होईना, गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू करून दिली, मात्र त्यासोबतच 'लोकप्रतिनिधी कसा नसावा' याचेही उदाहरण समोर ठेवले," अशा शब्दांत तांबे यांनी आपला संताप व्यक्त केला.

गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचा संदर्भ

कॉ. गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक आजही तितकेच समर्पक असल्याचे तांबे यांनी नमूद केले. १९८७ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे महत्त्व ३९ वर्षांनंतरही कमी झालेले नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली. २०१५ मध्ये पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या वेळी अहमदनगरमध्ये या पुस्तकाच्या १०,००० प्रती वाटून प्रबोधन केल्याची आठवणही त्यांनी यानिमित्ताने ताजी केली.

स्वराज्य म्हणजे सर्वसमावेशक लोकशाही

Advertisement

महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हे केवळ एका विशिष्ट वर्गाचं नव्हतं, तर ते 'रयतेचं राज्य' होतं, असे तांबे यांनी स्पष्ट केले. ते लिहितात:

"बारा बलुतेदार, अठरा पगड जाती आणि सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन महाराजांनी समावेशक स्वराज्य उभारलं. राजाने जनतेला लुटण्यापेक्षा रयतेला केंद्रबिंदू ठेवून राज्यकारभार करणे, हाच खरा लोकशाहीवादी विचार होता."

स्त्री सन्मानाचा विसर पडलेल्यांना चपराक

पोस्टच्या शेवटी तांबे यांनी संजय गायकवाड यांच्या फोनवरील कथित संभाषणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "महाराजांनी परस्त्रीला आई मानण्याचा दंडक घालून दिला होता. शत्रू पक्षाच्या स्त्रियांचाही आदर करणाऱ्या महाराजांच्या महाराष्ट्रात, गायकवाड यांनी वापरलेली भाषा कदापि स्वीकारार्ह नाही. अशा शब्दांमुळे महाराज त्यांना कधीच माफ करणार नाहीत," असे तांबे यांनी ठणकावून सांगितले आहे.

पुढील पिढीला दिशा देण्याची गरज

आजच्या नव्या पिढीपर्यंत महाराजांची खरी आणि समतोल ओळख पोहोचणे ही काळाची गरज आहे. ही चर्चा केवळ वादासाठी नसून योग्य अभ्यास आणि पुढच्या पिढीला दिशा देण्यासाठी व्हावी, अशी अपेक्षा सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.

?s=20

Comments

No comments yet.