मुंबई, (प्रतिनिधी) २६ एप्रिल - मुंबईतील शहरी वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आणि टॅक्सी-रिक्षा चालकांना डिजिटल बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत 'भारत टॅक्सी ड्रायव्हर ऑनबोर्डिंग' उपक्रमाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम चालकांचे आर्थिक कल्याण, पारदर्शकता आणि सुसंघटित वाहतूक प्रणालीवर लक्ष केंद्रित करणार आहे.
चालक आता मालक आणि भागीदार
कांदिवली पश्चिम येथील कमला विहार स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात शेकडो ऑटो-रिक्षा आणि कॅब चालक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, "भारत टॅक्सीमुळे चालकांना केवळ कामगार म्हणून नव्हे, तर भागीदार म्हणून या मंचावर येता येईल. सहकारी आणि तंत्रज्ञान-आधारित या प्रारूपाुळे चालकांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळेल आणि त्यांची कमाई वाढण्यास मदत होईल. भविष्यातील शहरी वाहतुकीची ही एक नवी दिशा आहे."
काय आहे 'भारत टॅक्सी' उपक्रम?
डिजिटल सक्षमीकरण: टॅक्सी आणि रिक्षा चालकांना एका सुसंघटित डिजिटल मंचाशी जोडले जाईल.
पारदर्शकता: प्रवासाचे दर आणि कमाई यामध्ये पूर्ण पारदर्शकता असेल.
विस्तार: दिल्ली एनसीआर, गुजरात आणि लखनौ नंतर आता मुंबईत या नेटवर्कचा विस्तार होत आहे.
प्रचंड प्रतिसाद: सध्या या मंचाशी ५.१७ लाखांहून अधिक चालक आणि ५० लाखांहून अधिक ग्राहक जोडले गेले आहेत. दरमहा जवळपास १० लाख फेऱ्या या माध्यमातून पूर्ण केल्या जातात.
अमित शाह यांची दूरदृष्टी; ३ वर्षांत देशव्यापी विस्तार
हा उपक्रम केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीचा भाग आहे. पुढील तीन वर्षांत भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 'भारत टॅक्सी' सेवा कार्यरत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या राष्ट्रीय आराखड्यात मुंबई हा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
स्थानिक संघटनांचा पाठिंबा
भारत टॅक्सीचे सीओओ विवेक पांडे यांनी सांगितले की, मुंबई ही उच्च क्षमतेची बाजारपेठ असून स्थानिक चालक संघटनांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. यामुळे मुंबईत एक मजबूत चालक परिसंस्था (Ecosystem) निर्माण होणार असून प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होईल. या कार्यक्रमामुळे मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत आता सहकारी तत्त्वावरील हा मंच चालकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.