निमाणी बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट... इतक्या महिलांची मंगळसूत्रे लंपास...

Share:
Main Image
Last updated: 23-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ एप्रिल - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील वाहतूक नियोजनात बदल झाले असून, बहुतांश बाहेरील गावी जाणाऱ्या बसेस आता निमाणी बसस्थानकावरून सुटत आहेत. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी या परिसरात उच्छाद मांडला असून, मंगळवारी (दि. २१) एकाच बसमध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी हातोहात लांबवले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

गर्दीचा फायदा घेत मारला डल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील रहिवासी तुळसाबाई कौतिक आहेर या मंगळवारी दुपारी बाहेरगावी जाण्यासाठी निमाणी बसस्थानकावर आल्या होत्या. नाशिक-कळवण बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १.५ तोळे वजनाचे (सुमारे ७० हजार रुपये किमतीचे) डोरले अत्यंत शिताफीने चोरून नेले.

एकाच बसमध्ये दोन महिलांना लक्ष्य

चोरट्यांचा धीटपणा इतका वाढला आहे की, त्यांनी याच बसमध्ये चढणाऱ्या दुसऱ्या महिला प्रवासी अलका काशिनाथ गांगुर्डे यांनाही लक्ष केले. गांगुर्डे यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्रही चोरट्यांनी लंपास केले. बसमध्ये चढण्याच्या धांदलीत दोन्ही महिलांना त्यांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले नाही. काही वेळाने दागिने नसल्याचे समजताच बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलीस तपास सुरू
या प्रकरणी तुळसाबाई आहेर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांचा एकत्रित गुन्हा दाखल केला असून, हवालदार नवनाथ रोकडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

प्रवाशांची मागणी:
निमाणी बसस्थानक परिसरात सध्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. बसमध्ये चढताना होणाऱ्या ढकलाढकलीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. पोलिसांनी या ठिकाणी साध्या वेशातील कर्मचारी तैनात करावेत आणि गस्त वाढवावी, अशी मागणी त्रस्त प्रवाशांनी केली आहे.

Comments

No comments yet.