नाशिक, (प्रतिनिधी) २२ एप्रिल - नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी (दि. २१) शहरातील वेगवेगळ्या चार भागांत राहणाऱ्या व्यक्तींनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविली. मृतांमध्ये एका तरुणासह तीन प्रौढांचा समावेश असून, या प्रकरणी नाशिकरोड, पंचवटी, एमआयडीसी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यांत मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
जेलरोड भागात गळफास
पहिली घटना जेलरोडमधील श्रीरामनगर भागात घडली. येथील कैलास पगाजी शिंदे (वय ५०, रा. सुमाई अपार्टमेंट) यांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला स्कार्फ बांधून गळफास घेतला. मुलगा सुशील शिंदे यांनी त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे हवालदार भोळे पुढील तपास करत आहेत.
विषप्राशन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
पेठरोडवरील कर्णनगर भागात राहणाऱ्या संतोष उमाजी जाधव (वय ४७) यांनी १५ एप्रिल रोजी शरदचंद्र पवार मार्केट परिसरातील एका शाळेच्या भिंतीजवळ विषारी औषध सेवन केले होते. त्यांचा मुलगा शुभम जाधव याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, सहा दिवसांच्या झुंजीनंतर सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. पंचवटी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अंबड औद्योगिक वसाहतीत तरुणाची आत्महत्या
अंबड एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या पप्पू विजयकुमार (वय ३०) या तरुणाने मंगळवारी अज्ञात कारणातून राहत्या घरात पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. घरमालक संतोष उपाध्याय यांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मखमलाबाद शिवारात युवकाचा टोकाचा निर्णय
चौथी घटना मखमलाबाद शिवारातील नमन हॉटेलच्या मागे घडली. वैभव हिरामण मौले (वय २४, रा. नमो गुरुदेव अपार्टमेंट) या युवकाने मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे मामा दिलीप तलवारे यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार सोनवणे तपास करत आहेत.
कारणे अद्याप अस्पष्ट
या चारही घटनांमध्ये आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी सर्व मृतदेहांचे विच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शहरात एकाच दिवशी घडलेल्या या चारही घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.