नागपूर, (प्रतिनिधी) १९ एप्रिल - नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "हे प्रकरण आज घरोघरी पोहोचले आहे, याचे श्रेय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जाते. जर हा बाबा शिंदेंचा नसता आणि अजित पवार गटाच्या रूपाली चाकणकर या बाबाच्या भक्त नसत्या, तर हे प्रकरण पोलिसांनी त्यांच्या स्तरावर कधीच दाबले असते," असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केला आहे.
शिंदेंना आणि राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी तपास?
प्रा. श्याम मानव यांनी थेट सरकारवर निशाणा साधत म्हटले की, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) धडा शिकवण्याच्या उद्देशानेच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. मित्रपक्षातील नेत्यांचे संबंध या प्रकरणाशी जोडले गेल्यामुळेच पोलीस आता पूर्ण ताकदीने तपास करत असल्याचा दावा त्यांनी केला. "अशोक खरात उघड झाला, यासाठी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजेत," असा टोलाही त्यांनी लगावला.
खंडणी वसुलीचे 'हायटेक' जाळे
अशोक खरातच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना प्रा. मानव म्हणाले की, या भोंदू बाबाने केवळ भक्तीचा बाजार मांडला नव्हता, तर त्याने फसवणुकीचे एक मोठे जाळे विणले होते.
बनावट आयटी रेड: खरात विविध माध्यमांतून लोकांच्या 'ब्लॅक इन्कम'ची माहिती काढायचा.
तोतया अधिकारी: त्यानंतर स्वतःचे बनावट इन्कम टॅक्स अधिकारी तयार करून संबंधित व्यक्तींवर धाडी टाकायचा आणि त्या माध्यमातून लाखो रुपये उकळायचा.
प्रशासकीय वरदहस्त: अनेक आयपीएस महिला अधिकारी आणि बडे शासकीय अधिकारी त्याचे शिष्य असल्यामुळे आजवर त्याच्या विरोधात कोणीही राजकीय पुढारी किंवा पोलीस अधिकारी हस्तक्षेप करण्यास धजावले नाहीत.
"हजारो महिला स्वतःला 'अर्पण' करतात, ही देशाची शोकांतिका!"
महिलांच्या शोषणाबाबत बोलताना प्रा. मानव यांनी संताप व्यक्त केला. "आज देशात अशी भयावह परिस्थिती आहे की, एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारी होते. मात्र, दुसरीकडे हजारो महिला स्वतःला या भोंदू बाबांच्या चरणी अर्पण करत आहेत. बाबांना महिलांचे कपडे काढण्याची किंवा बळजबरी करण्याची गरज उरत नाही; 'मी तुमचा गुरु आहे' असे जाहीर केले की सर्व काही सहज उपलब्ध होते. हजारो वर्षांपासून हे शोषण आपल्या संस्कृतीचा भाग मानले जात आहे, ही मोठी खंत आहे," असे ते म्हणाले.
तपासाकडे राज्याचे लक्ष
अशोक खरात प्रकरणातील राजकीय कनेक्शन आणि त्याने पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात कसे ओढले, याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. श्याम मानव यांच्या या दाव्यामुळे आता सत्ताधारी गोटातून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.