युद्धजन्य परिस्थितीचा उद्योगांना फटका... उद्योजक आणि कामगारांसाठी विशेष हेल्पलाईन... मिळेल ही मदत...

Share:
Main Image
Last updated: 17-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ एप्रिल - जागतिक पातळीवर सध्या उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्योग आणि व्यापार क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर, विविध क्षेत्रांतील कामगार आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्तालयाने '२४ तास हेल्पलाईन सेवा' सुरू केली आहे. कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी या उपक्रमाची घोषणा करत, अडचणीत असलेल्या उद्योजक व कामगारांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

२४ तास मदतीसाठी संपर्क क्रमांक
जागतिक संघर्षाचा परिणाम कच्चा माल, पुरवठा साखळी आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर होत आहे. या समस्यांची दखल घेण्यासाठी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील 'कामगार भवन' मध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

हेल्पलाईन क्रमांक: ०२२-२६५७२९२५
पत्ता: कामगार आयुक्तालय, कामगार भवन, ब्लॉक-ई, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई.

उद्योजक-कामगारांना दिलासा
युद्धाच्या सावटाखाली अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर परिणाम झाला असून, त्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा किंवा उद्योजकांच्या व्यावसायिक गणितांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांना कायदेशीर सल्ला, तांत्रिक मार्गदर्शन किंवा प्रशासकीय मदत मिळावी, या उद्देशाने ही हेल्पलाइन २४ तास सुरू राहणार आहे.

राज्य शासनाच्या या पावलामुळे जागतिक अस्थिरतेच्या काळात राज्यातील उद्योग क्षेत्राला आणि कामगार वर्गाला मोठा आधार मिळणार आहे.

Comments

No comments yet.