शिवसेना उबाठात २००३ च्या इतिहासाची पुनरावृत्ती? १९ जूनला मोठा धमाका होणार?

Share:
Main Image
Last updated: 15-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १५ एप्रिल - आगामी १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या मुहूर्तावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मोठी संघटनात्मक फेरबदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे युवा नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आता अधिकृतपणे 'कार्याध्यक्ष' पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

२००३ ची पुनरावृत्ती?
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही घटना २००३ च्या महाबळेश्वर अधिवेशनाची आठवण करून देणारी ठरेल. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली होती. आता तोच वारसा पुढे नेत, उद्धव ठाकरे आपले पुत्र आदित्य ठाकरे यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात अधिक ताकदीने उतरवण्याच्या तयारीत आहेत.

Advertisement

तरुण रक्ताला संधी:
आदित्य ठाकरे सध्या राज्यभर दौरे करून पक्षबांधणी करत आहेत. युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी तरुणांचे मोठे जाळे विणले आहे. आता कार्याध्यक्ष म्हणून त्यांची अधिकृत घोषणा झाल्यास, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची एक 'नवी कोअर टीम' तयार केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने नव्या चेहऱ्यांना आणि आक्रमक तरुणांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांचे संकेत:
खासदार संजय राऊत यांनीही एका संदर्भात बोलताना "पक्षाला नव्या रक्ताची गरज असून तरुणांना संधी देणे काळाची गरज आहे," असे विधान केले होते. यामुळे आदित्य ठाकरेंच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे मानले जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. १९ जूनच्या वर्धापन दिनाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.