मुंबई, (प्रतिनिधी) १२ एप्रिल - राज्यातील बालकांचे मानसिक आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या मानसिक स्वास्थ्य बळकटीकरणासाठी पुणे येथील 'एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ' सोबत एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली आहे.
बालकांचे मानसिक आरोग्य हाच राज्याचा पाया : मुख्यमंत्री
या उपक्रमाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बालकांचे मानसिक आरोग्य हे राज्याच्या उज्ज्वल भविष्याचे पायाभूत तत्व आहे. या करारामुळे आपण बालकांच्या भावनिक आणि मानसिक सक्षमीकरणासाठी एकत्रित प्रयत्न करत आहोत. याचा मोठा फायदा भविष्यात होणार असून, प्रत्येक बालक आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करू शकेल."
उपक्रमाची व्याप्ती आणि स्वरूप
हा सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आला असून, त्याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये खालील उपक्रम राबवले जातील:
केअरगिव्हर-लेड सेल्फ हेल्प ग्रुप्स : पालकांना आणि काळजी घेणाऱ्यांना प्रशिक्षित करून रुग्ण व त्यांच्या कुटुंबाला आधार दिला जाईल.
डिजिटल व ऑफलाइन माध्यम : जनजागृती वाढवण्यासाठी आणि मानसिक आजारांशी संबंधित असलेला सामाजिक कलंक (Stigma) दूर करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाईल.
डीएमएचपी समन्वय : हा कार्यक्रम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाशी (DMHP) जोडून अधिक प्रभावीपणे राबवला जाईल.
प्रशासकीय उपस्थिती
यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार नाना पटोले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह एकलव्य फाउंडेशनचे संस्थापक-संचालक डॉ. प्रा. अनिल वर्तक, उपाध्यक्ष प्राची बर्वे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.