शरद पवारांना धक्का... समरजितसिंह घाटगे भाजपमध्ये... कोल्हापूरचे राजकीय समीकरण बदलणार...

Share:
Main Image
Last updated: 08-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ८ एप्रिल - कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे नाव आणि कागलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.
भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : रवींद्र चव्हाण

यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, "समरजितसिंह घाटगे यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व भाजपसोबत आले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत होईल. भाजपची विचारधारा गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. घाटगे यांनी ज्या विश्वासाने पक्षात प्रवेश केला आहे, त्याला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही."

जबाबदारी निष्ठेने पार पाडू : समरजितसिंह घाटगे
"पक्ष जी जबाबदारी सोपवेल, ती पूर्ण निष्ठेने आणि जोमाने पार पाडू. भाजपची विचारधारा घराघरांत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत," असा निर्धार समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह आणि राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनीही पक्षप्रवेश केला.

Advertisement

कागलमधील लोकप्रतिनिधींची मोठी रसद
समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत कागल आणि परिसरातील अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यामध्ये प्रामुख्याने:
 प्रमुख पदाधिकारी: पंचायत समिती सभापती सौ. सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण, बाजार समिती सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा कारखान्याचे संचालक कैलाश जाधव.
 नगरसेवक व सदस्य: जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, रंजना अस्वले तसेच दीपक मगर, अरुण गुरव, सारिका बारड, साधना पाटील यांसह अनेक नगरसेवक आणि सरपंचांचा समावेश आहे.

या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments

No comments yet.