नाशिक, (प्रतिनिधी) ८ एप्रिल - नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनावरून पर्यावरण प्रेमी आणि सरकार यांच्यातील संघर्ष आता तीव्र होताना दिसत आहे. प्रख्यात विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी सरकारला एक 'खुले पत्र' लिहून साधुग्रामसाठी केली जाणारी वृक्षतोड आणि निसर्गाचा होणारा ऱ्हास यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "निसर्ग आणि पर्यावरणाचे मारेकरी म्हणजे देशाचे गद्दारच," अशा जळजळीत शब्दात त्यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे.
एनजीटीच्या स्थगितीचा दिला दाखला
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) कुंभमेळ्यासाठी झाडे कापण्यावर नुकतीच स्पष्ट स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरोदे यांनी पत्रात म्हटले आहे की, मागील वेळी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन कागदोपत्री बोगस कार्यवाही करत मोठमोठी झाडे जमिनीवर लोळवण्यात आली होती. मात्र, यावेळी न्यायालयाने स्पष्टपणे झाडे न तोडण्याचे आदेश दिले आहेत.
भव्यतेच्या 'नादा'पायी विघातक राजकारण
सरकारवर टीका करताना सरोदे यांनी राजकीय स्पर्धेचाही उल्लेख केला.
"तुम्हाला लागलेला भव्यतेचा 'नाद' मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रकोप घडवेल. केवळ राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि 'कट्टर हिंदुत्ववादी' दिसण्याच्या स्पर्धेतून नाशिकच्या पर्यावरणावर करवती चालवू नका," असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
सरोदे यांनी पत्रात उपस्थित केलेले मुख्य मुद्दे:
संस्कृतीचा विसर:* निसर्गासोबत जगणे ही मानवी संस्कृती आणि सनातन धर्म आहे, मग साधुग्रामसाठी वृक्षतोड कोणत्या संस्कृतीत बसते?
निसर्गाचा प्रकोप:* जेव्हा निसर्ग निषेध करेल, तेव्हा कोणीही सत्ताधारी, साधू-महंत किंवा धर्मगुरु मानवी जमातीला वाचवू शकणार नाहीत.
प्राधान्यक्रम चुकला:* जनतेचा पैसा खर्च करताना सरकार आपला प्राधान्यक्रम चुकवत असून, पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणे घातक ठरेल.
राजकारण दूर ठेवा:* राजकारणाचे आणि पैशांचे हिशोब निसर्गापासून दूर ठेवण्याची नम्र विनंती त्यांनी 'लोकल चाणक्यांना' केली आहे.
'गद्दारी'ची व्याख्या
देशावर आणि भारतभूमीवर प्रेम करणे सोपे नाही, असे नमूद करतानाच त्यांनी स्पष्ट केले की, जे या भूमीचा निसर्ग नष्ट करत आहेत, ते खऱ्या अर्थाने देशाशी गद्दारीच करत आहेत. "एकदा देशावर मनापासून प्रेम करून बघा, प्रयत्न केला तर नक्की जमेल," असा टोलाही त्यांनी पत्राच्या शेवटी लगावला आहे.
आता या पत्रावर सरकार आणि स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
?s=20