नाशिक, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित राज्यस्तरीय वरिष्ठ महिला निमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत (इन्व्हिटेशन लीग) यजमान नाशिक जिल्हा महिला संघाने आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. क्रीडक क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात नाशिकने पुण्याच्या चंद्रोस क्लबचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. कर्णधार रसिका शिंदेची ६१ धावांची खेळी आणि वैभवी बालसुब्रमणीयमने घेतलेले ३ बळी नाशिकच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
नाशिकचा प्रभावी मारा
नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाशिकच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर चंद्रोस क्लबचा डाव अवघ्या १०५ धावांत आटोपला. चंद्रोसतर्फे कर्णधार प्रियांका संगवानने सर्वाधिक ४५ धावा करत एकाकी झुंज दिली. मात्र, नाशिकच्या वैभवी बालसुब्रमणीयमने आपल्या लेग स्पिनच्या जोरावर फलंदाजांना जखडून ठेवले आणि महत्वपूर्ण ३ गडी बाद केले. तिला शाल्मली क्षत्रिय, मधुरा दायमा, ऐश्वर्या वाघ आणि प्रचिती भवर यांनी प्रत्येकी १ बळी घेत उत्तम साथ दिली.
रसिका-प्रचितीची अभेद्य भागीदारी
विजयासाठी १०६ धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नाशिकच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला. कर्णधार रसिका शिंदेने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत केवळ २० व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. रसिकाने ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर तिला दुसऱ्या टोकाकडून प्रचिती भवरने ३० धावांचे योगदान देत चांगली साथ दिली. नाशिकने अवघा १ गडी गमावून हे लक्ष्य सहज पार केले.
इतर सामन्यांचे निकाल:
* लातूर विरुद्ध सांगली (मेरी मैदान): लातूरने सांगलीवर १५७ धावांनी मोठा विजय मिळवला. सरस्वती कोकरेने ७० धावा आणि ३ बळी घेत अष्टपैलू कामगिरी केली.
* उस्मानाबाद विरुद्ध सी डी ए पुणे (एस एस के मैदान): उस्मानाबादने सी डी ए पुणेचा ९ गडी राखून पराभव केला. कर्णधार समृद्धी डालेने नाबाद ७९ धावांची खेळी केली, तर प्रीती शेळकेने ३ बळी टिपले.
नाशिकच्या या शानदार विजयाबद्दल जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खेळाडूंचे कौतुक करण्यात येत आहे.