दिंडोरी: (प्रतिनिधी), ४ एप्रिल २०२६
एका खाजगी क्लासचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव सोहळा आटोपून आनंदाने घरी परतत असताना, काळानं नियतीचा क्रूर फास आवळला. दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांसह पालकांची कार रस्त्याशेजारील उघड्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ लहान विद्यार्थी आणि २ पालकांचा समावेश असून, या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.
आनंदाचा सोहळा शोकात विरला
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी दिंडोरी शहरात एका खाजगी शिकवणी वर्गाच्या कार्यक्रमासाठी आले होते. वर्षभराच्या कष्टाचे फळ आणि गुणगौरव झाल्याने सर्व विद्यार्थी उत्साहात होते. रात्री १० वाजेच्या सुमारास कार्यक्रम आटोपून हे सर्वजण कारने (क्र. MH15-JS-1053) गावाकडे निघाले. मात्र, शिवाजी नगर भागातील राजू राजे यांच्या मालकीच्या उघड्या आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने ही कार थेट विहिरीत कोसळली.
तीन हायड्रा क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाणी जास्त असल्याने आणि रात्र असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत होते. अखेर तब्बल तीन हायड्रा क्रेनच्या साहाय्याने रात्री १२ वाजेच्या सुमारास कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कारमधील ९ जणांचा गुदमरून व पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दोन भावांच्या कुटुंबावर कोसळली कुऱ्हाड
या भीषण दुर्घटनेत इंदोरे येथील सुनील दत्तात्रेय दरगोडे आणि अनिल मनोहर दरगोडे या दोन भावांच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीचे कौतुक पाहायला गेलेल्या या कुटुंबावर एका क्षणात काळाने घाला घातला.
मृतांची नावे:
* सुनील दत्तू दरगोडे (पालक)
* राखी सुनील दरगोडे
* उषा अनिल दरगोडे (पालक)
* श्रद्धा अनिल दरगोडे
* श्रावणी अनिल दरगोडे
(इतर ४ मृत विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.)
उघड्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर
या भीषण दुर्घटनेनंतर रस्त्याशेजारील उघड्या विहिरी आणि सुरक्षेचा अभाव यावर संताप व्यक्त केला जात आहे. जर या विहिरीला संरक्षक भिंत असती, तर कदाचित हे नऊ जीव वाचले असते, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. दिंडोरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.