महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट गडद... गारपीट व वादळी पावसाचा पुन्हा इशारा

Share:
Main Image
Last updated: 31-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३१ मार्च - राज्यातील हवामानात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, येत्या ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रभर अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ३१ मार्च रोजी राज्याच्या अनेक भागांत 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, गारपीट व ३० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज
 * ३१ मार्च (ऑरेंज अलर्ट): नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार गारपीटीची शक्यता आहे.
 * यलो अलर्ट: कोकण (ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), विदर्भ (नागपूर, अमरावती, गडचिरोली इ.) आणि उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
 * १ ते ३ एप्रिल: पावसाचा जोर हळूहळू कमी होईल, मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' कायम असून ढगाळ हवामान व तुरळक ठिकाणी पाऊस सुरूच राहील.

Advertisement

शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला: पिकांचे संरक्षण करा
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रबी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी खालील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:
१. रबी पिके (गहू, मका, ज्वारी):
सध्या ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांनी पुढील २४ तासांत तयार पिकाची काढणी उरकून घ्यावी. मळणी केलेले धान्य ताडपत्रीने सुरक्षित झाकून ठेवावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
२. द्राक्ष बागायतदार:
पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे (Cracking) जाण्याची शक्यता असते. तडे गेल्यास बुरशीनाशकाची (कायटोसॅन + ट्रायकोडर्मा) फवारणी करावी. बेदाणे शेडमध्ये पाणी शिरणार नाही याची दक्षता घ्यावी. गारांपासून वाचवण्यासाठी 'हेलनेट'चा वापर करावा.
३. आंबा व केळी:
पक्व झालेली आंबा फळे तातडीने उतरवून सुरक्षित स्थळी ठेवावीत. फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत कामगंध सापळे लावावेत. केळीची झाडे कोसळू नयेत म्हणून त्यांना बांबूचा आधार द्यावा.
४. भाजीपाला:
वेलवर्गीय भाज्यांना आधार द्यावा आणि रोपवाटिका (Nursery) प्लास्टिक पेपरने झाकून घ्यावी.

वीज कोसळण्याचा धोका: काय करावे, काय टाळावे?
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार असल्याने पशुपालक आणि शेतकरी यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे:
 * काय करावे: विजा चमकत असताना शेतात असल्यास झाडाखाली उभे न राहता उघड्यावर पाय पोटाशी धरून दड घालून बसावे. जनावरांना सुरक्षित गोठ्यात बांधावे.
 * काय टाळावे: विजांच्या वेळी मोबाईलचा वापर टाळावा. विद्युत खांब, ट्रॅक्टर, दुचाकी किंवा धातूच्या कुंपणाजवळ उभे राहू नका. जनावरांना तलाव किंवा विहिरीच्या काठावर नेऊ नका.

हवामानातील हा बदल ३ एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि बळीराजाने सतर्क राहून आपल्या मालाचे व जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन कृषी संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.