नाशिक, (प्रतिनिधी) २७ मार्च - शहरात आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, गुरुवारी (दि. २६) वेगवेगळ्या भागात तीन व्यक्तींनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका ३६ वर्षीय महिलेसह, ३० वर्षीय तरुण आणि धुळे जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. घरगुती वाद आणि अन्य अज्ञात कारणांमुळे या घटना घडल्या असून, शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
कौटुंबिक वादातून महिलेची विषप्राशन करून आत्महत्या
म्हसरूळ परिसरातील आदर्श नगर, शिवगंगा सोसायटीत राहणाऱ्या अंजना अशोक बनसोडे (३६) यांनी गुरुवारी टोकाचे पाऊल उचलले. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून त्यांनी विषारी औषध सेवन केले होते. पती अशोक बनसोडे यांनी त्यांना तातडीने पेठ रोडवरील नामको हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. डॉ. अनिल शहा यांनी त्यांना मृत घोषित केले असून, म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार सोनवणे पुढील तपास करत आहेत.
सिडकोत तरुणाचा गळफास
दुसरी घटना सिडकोतील लेखानगर भागात घडली. येथील इंदिरा गांधी वसाहतीत राहणारे अंबादास चंद्रकांत केदारे (३०) यांनी गुरुवारी सकाळी अज्ञात कारणातून राहत्या घरात पंख्याच्या हुकाला साडी बांधून गळफास घेतला. शेजारी दत्ता केदार यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून हवालदार आवारे तपास करत आहेत.
उपचारादरम्यान १७ वर्षीय मुलाचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातील नागाव येथील दीपक अविनाश पाटील (१७) या अल्पवयीन मुलाने रविवारी (दि. २२) अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. धुळे येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारार्थ नाशिकमधील सातपूर येथील शिव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीपकचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. सृष्टी जैन यांनी त्याला मृत घोषित केले. सातपूर पोलीस ठाण्यात हवालदार घारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नैराश्य किंवा मनात आत्महत्येचे विचार येत असल्यास कृपया तज्ज्ञांची मदत घ्या. संवाद साधा, जीवन अमूल्य आहे.