राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी इतक्या हजार रुपयांचे अनुदान...

Share:
Main Image
Last updated: 22-Mar-2026

सोलापूर, (प्रतिनिधी), दि. २२ मार्च २०२६

जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मशांती मिळविण्यासाठी माऊलींचे विचार आवश्यक आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यावतीने आयोजित ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ चे उद्घाटन मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. हा कार्यक्रम सरस्वती विद्यामंदिर, सोलापूर येथे पार पडला.  कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, मोहन डोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, शाळेचे संचालक प्रशांत बडवे, देवसर तसेच इतर मान्यवर व भजनी मंडळे उपस्थित होती.

 

Advertisement

सर्वांचा आत्मा एकच असून मानवता हा एकच धर्म आहे. हे सर्व जगाला पटवून देण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीचे लिखाण केले आणि तेही अतिशय सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत त्याचे भाषांतर केले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत हे माऊलींचे विचार जगभरातील सर्व देशात पटवून देण्याचे कार्य केले जाईल, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करताना सांगितले की, “मोगरा फुलला या अभंगांमध्ये मानवी मनाला नवसंजीवनी देण्याची ताकद आहे. हा कार्यक्रम भारताबाहेर इतर देशात सादर करून ‘पसायदान’चे महत्त्व तेथील लोकांना पटवून दिले जाईल.

कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. यामध्ये बार्शी, उत्तर सोलापूर व धाराशिव येथील भजनी मंडळांचा समावेश होता. अनुदानाचे धनादेश मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सादरीकरण गायक गणेश शिंदे व संमती शिंदे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

Comments

No comments yet.