नाशिक, (प्रतिनिधी) २० मार्च - मालेगाव तालुक्यातील संवदगाव परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज पाहणी केली. या नुकसानाचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षण मंत्री भुसे यांनी प्रशासनाला दिले.
संवदगाव परिसरात मागील दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी आज सकाळी संवदगाव येथे भेट देत पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण उपस्थित होते. तसेच महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची आढावा बैठक घेतली. मंत्री भुसे यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करावा. बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अपर जिल्हाधिकारी केकाण यांनी गाळणे, सतमाने, ता. मालेगाव परिसरात भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाच्या माध्यमातून पंचनाम्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.