मुंबई, (प्रतिनिधी) २० मार्च - ग्रामीण भागातील बांधकाम परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेमध्ये सदस्य विक्रांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी चर्चेत सदस्य विक्रम काळे, सत्यजित तांबे यांनी सहभाग घेतला.
मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले, सध्याच्या एमआरटीपी ॲक्ट 1966 मधील तरतुदींमुळे परवानगी प्रक्रिया गुंतागुंतीची झाली असून, त्यात बदल करणे आवश्यक आहे. विशेषतः सेक्शन 18 मध्ये सुधारणा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. परवानग्यांचे केंद्रीकरण जिल्हास्तरावर झाल्यामुळे ऑनलाईन प्रणाली असूनही अर्ज प्रलंबित राहतात. त्यामुळे या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करून तालुका स्तरावर परवानग्या देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे नागरिकांना जलद सेवा मिळू शकणार आहे.
पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींना मर्यादित बांधकाम परवानग्या देण्याचे अधिकार पुन्हा देण्याबाबतही विचार सुरू आहे. ग्रामीण भागात 1000 ते 1500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी स्थानिक स्तरावरच परवानगी मिळावी, यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम (बीपीएमएस) मधील तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. अर्जदारांनी कागदपत्रे पूर्ण न केल्यास इतर अर्जदारांचे प्रस्ताव अडकू नयेत, यासाठी प्रणालीत बदल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अपूर्ण अर्जांमुळे इतर अर्जदारांना होणारा त्रास टाळण्यासाठी वेळमर्यादा निश्चित केली जाईल. ठराविक कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित अर्ज बाजूला ठेवण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी स्पष्ट केले.