नाशिक (प्रतिनिधी) १८ मार्च २०२६
पेठरोडवरील नवनाथनगर भागात दीड महिन्यापूर्वी झालेल्या कौटुंबिक वादातून मुलाने पित्यावर केलेल्या चाकू हल्ल्याचा शेवट अखेर मृत्यूत झाला आहे. उपचार सुरू असताना मंगळवारी पित्याची प्राणज्योत मालवली असून, पंचवटी पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे. त्याच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथनगर येथील रोकडे चाळ परिसरात राहणारे सखाराम पंडित भावसार (वय ६५) आणि त्यांचा मुलगा अश्विन सखाराम भावसार (वय ३५) यांच्यात गेल्या ५ फेब्रुवारी रोजी दुपारी किरकोळ कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात अश्विनने घरातील चाकू काढून वडिलांच्या पोटात वार केले.
दीड महिन्यांपासून मृत्यूशी झुंज
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सखाराम यांना शेजाऱ्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले होते. गेल्या दीड महिन्यांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, मंगळवारी (दि. १७) सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉ. बिराली पांडे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
संशयित मुलगा पोलिसांच्या ताब्यात
याप्रकरणी सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल होता, मात्र मृत्यू पश्चात आता याचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात झाले आहे. हवालदार केशव भोये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संशयित मुलगा अश्विन भावसार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.