भोंदू अशोक खरातचे राजकीय 'कनेक्शन' उघड... महिला आयोगाच्या अध्यक्षांसह अनेक नेते सहभागी?

Share:
Main Image
Last updated: 18-Mar-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी), दि. १८ मार्च २०२६

स्वतःला 'कॅप्टन' आणि राजकीय ज्योतिष म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याला नाशिक गुन्हे शाखेने बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरात याच्याकडे असलेल्या पेनड्राइव्हमधून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून, या प्रकरणाचे धागेदोरे राज्यातील बड्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजकीय 'भक्तांची' नावे चर्चेत; अघोरी कृत्यांचा संशय

​अशोक खरात याच्याकडे अनेक बड्या नेत्यांचा राबता होता. यामध्ये केसरकर, तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या नावांची चर्चा आता जोर धरू लागली आहे. अनेक नेत्यांनी खरातच्या सांगण्यावरून अघोरी पूजा करणे, इतकेच काय तर स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेण्यासारखे प्रकार केल्याची चर्चा सामान्यांमध्ये आहे. खरातने स्थापन केलेल्या संस्थेवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या संचालक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी खरातवर झालेल्या आरोपांवेळी चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तक्रारदार संस्थेवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींकडे न्यायाची अपेक्षा

Advertisement

​सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना साकडे घातले आहे. "एका लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या व्यक्तीला महिला आयोगासारख्या जबाबदार पदावर ठेवावे का? हे सुनेत्रा वहिनींना तरी पटते का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खरातच्या कौटुंबिक कार्यक्रमातही चाकणकर यांची उपस्थिती संशयास्पद असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.

अंनिसची पोलीस आयुक्तांकडे धाव; सखोल चौकशीची मागणी

​महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि डॉ. टी. आर. गोराणे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन खरातच्या सर्व गैरकृत्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनीही खरातची भेट घेतल्याचा दावा अंनिसने केला आहे.

​"५८ रहस्यमय व्हिडिओमध्ये अनेक बड्या हस्तींचे संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तपासावर राजकीय दबाव येण्याची आम्हाला दाट भीती आहे. अशा भोंदूला आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांना कडक कायदेशीर चपराक बसणे गरजेचे आहे," असे अंनिसने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

​या प्रकरणाने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, आता पोलीस कोणाकोणाचे बुरखे फाडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Comments

No comments yet.