त्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक... तीन महिन्यांत अहवाल...

Share:
Main Image
Last updated: 19-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १८ मार्च - छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य शासनाने विशेष तपास पथक  गठीत केले आहे. अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री बावनकुळे म्हणाले, ६ मार्च २०२६ रोजी विधानपरिषदेत हा विषय चर्चेला आला होता. त्यावेळी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

Advertisement

या पथकात पोलीस महानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक, नोंदणी उपमहानिरीक्षक तसेच भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक यांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार संबंधित विषयातील तज्ज्ञांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

पथक गठीत केल्याची माहिती स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली जाणार असून नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी विभागीय आयुक्तांकडे सादर कराव्यात.

या विशेष तपास पथकाची कार्यकक्षा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जमीन विषयक गंभीर तक्रारींची सखोल चौकशी करणे आणि त्यानुसार पुढील कार्यवाहीबाबत शासनास शिफारसी करणे अशी आहे. तपास पथक तीन महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करून सविस्तर अहवाल शासनाला सादर करेल, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Comments

No comments yet.