२० लाखांचे पॅकेज सोडून बनला आयपीएस...  शरण कांबळेची जिद्द बघाल तर चकितच व्हाल... 

Share:
Main Image
Last updated: 16-Mar-2026

अश्विनी भाटवडेकर, सोलापूर, १६ मार्च - परिस्थिती कितीही बिकट असली आणि स्वप्न कितीही मोठं असलं, तरी मेहनतीच्या जोरावर यश कसं मिळवता येतं, याचं उदाहरणच सोलापूरच्या ताडवाले गावातील शरण कांबळे यांनी घालून दिलं आहे. मजुरी करणाऱ्या वडिलांचा आणि भाजी विकणाऱ्या आईचा हा मुलगा आज केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर 'आयपीएस' (IPS) अधिकारी बनला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी चक्क २० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेली नोकरी सोडून हे यश मिळवले आहे.

शरण कांबळे यांचा हा प्रवास सोपा नव्हता. ताडवाले सारख्या छोट्या गावात जन्मलेल्या शरण यांच्या घरी आर्थिक चणचण होती. वडील मजुरी करायचे, तर आई भाजी विक्री करून संसाराचा गाडा हाकायचा हातभार लावायची. गावात वीज नसतानाही आणि शाळेसाठी रोज १२ किलोमीटरची पायपीट करताना शरण यांनी आपल्या अभ्यासाची जिद्द सोडली नाही.

शिक्षणाचा ध्यास
सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरण यांनी मागे वळून पाहिले नाही. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून बी.टेक आणि त्यानंतर प्रतिष्ठित आयआयएससी (IISc) मधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. अभ्यासातील सातत्य आणि महाराष्ट्र स्कॉलरशिपच्या मदतीने त्यांनी आपली ही शैक्षणिक प्रगती कायम ठेवली.

Advertisement

२० लाखांची नोकरी लावली पणाला
इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर शरण यांना एका नामांकित कंपनीत २० लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळाली. मात्र, त्यांचे ध्येय वेगळेच होते. समाजासाठी काम करण्याची इच्छा आणि सिव्हिल सर्व्हिसेसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी २० लाखांची नोकरी अवघ्या एका क्षणात सोडली.

सलग तीन वेळा यूपीएससी (UPSC) मध्ये यश
शरण कांबळे यांनी आपल्या ध्येयाचा ध्यास धरला आणि सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षेत यश मिळवून एक नवा इतिहास रचला. अखेर त्यांनी 'आयपीएस' अधिकारी होण्याचा मार्ग निवडला.

शरण कांबळे यांचे यश हे त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे, ज्यांच्या मार्गात गरिबी आणि अभाव आहेत. "मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न असतील, तर परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करता येते," हेच शरण कांबळे यांच्या यशाचे गमक आहे.

Comments

No comments yet.