अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीत झाले हे मोठे निर्णय... नूतन कार्यकारिणीही जाहीर...

Share:
Main Image
Last updated: 15-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १५ मार्च - ओबीसींचा लढा हा चालूच राहील सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून सर्व समाजांना सोबत घेऊन ओबीसींचा लढा सुरू ठेवावा.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बांद्रा येथे राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, ईश्वर बाळबुधे, डॉ.कैलास कमोद, दिलीप खैरे, ॲड.राजेंद्र महाडोळे, ॲड.सुभाष राऊत, सत्संग मुंडे, बाळासाहेब कर्डक, डॉ. स्नेहा सोनकाटे, मंजिरी धाडगे, शंकरराव लिंगे, सुनील मेटे, सदानंद मंडलिक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, माया इरतकर, आबा खोत, डॉ सुदर्शन घेराडे, यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बऱ्याच कालावधी नंतर समता परिषदेची राज्य कार्यकारिणीची बैठक आज घेण्यात आली. मधल्या काळात माझ्या आरोग्याच्या तक्रारी चालू होत्या पण सर्वसामान्य ओबीसी घटकाचे प्रश्न सोडविण्याचे काम मात्र अविरतपणे चालू होते.समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि त्यांचे सहकारी हे करत होते. हेच काम पुढे चालू राहावे यासाठी समता परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज देण्यात येत आहेत. 

पुढे ते म्हणाले की, केवळ आपल्या जातीचे नाव घेऊन कोणाला काही मिळणार नाही आपल्याला ओबीसी समूह म्हणून एकत्र राहिलो तर लढा देता येईल, संघर्ष करता येईल आणि आपल्या मागण्या मान्य करून घेता येईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना 4 वर्ग तयार केले होते त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि खुला असे वर्ग केले आहेत त्यामुळे आपल्याला ओबीसी म्हणून एकत्र राहिले पाहिजे. एकत्र राहिले म्हणून विविध राज्यात राजकीय क्षेत्रात त्याचा फायदा ओबीसी म्हणून आपल्याला मिळतो आहे. 

Advertisement

महाज्योतीसाठी आपण लढा दिला आणि निधीसाठी अजूनही देतो आहोत. आपल्या या संघर्षामुळे महाज्योतीचे अनेक विद्यार्थी चांगले शिक्षण घेत आहेत यातलेच ३२ विद्यार्थी हे आयएएस - आयपीएस ही संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाले आहेत. समता परिषद ही समाजाची गरज आहे. समता परिषदेने अनेक आंदोलने केली आहेत आणि पुढेही समाजातील वंचित शोषित घटकांसाठी गरज पडली तर समता परिषद निश्चितपणे रस्त्यावर उतरले आंदोलने करेल. आगामी काळत जनगणना होती आहे त्याचा लढा देखील अनेक वर्षे आपण दिला आहे. 

यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की,काही दिवसांपूर्वी आपण महाराष्ट्राचा दौरा केला.या दौऱ्यात संघटना बांधणी करण्यावर आपण चर्चा केली. त्यानुसार आज अनेक तालुकाध्यक्ष पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दि. ११ एप्रिल २०२६ रोजी द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त जयंती वर्ष सुरू होत आहे. या निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दि. ११ एप्रिल २०२६ ते दि. ११ एप्रिल २०२७ या काळात महात्मा फुले यांचे स्मरणार्थ व्याख्याने, मेळावे, सभा परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.त्याचप्रमाणे रक्तदान, आरोग्य शिबिरे, महिला मेळावे आदींचे आयोजन देखील केले जाणार आहेत. फुले-आंबेडकरी साहित्याचे जाहीर वाचन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.शाळा, महाविद्यालयातील मुला-मुलींसाठी फुले, आंबेडकरी विचारावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या काळात आंतरजातीय विवाहितांचे जाहीर सत्कार आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे

या बैठकीत आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, फुले -शाहू-आंबेडकरांचे विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतात. महात्मा फुले यांची जयंती साजरी करत असताना आपल्याला महाराष्ट्रात नाही तर देशात महात्मा फुले यांचे विचार घेऊन जावे लागतील. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याप्रमाणेच स्व.कांशीराम यांच्या जयंतीनिम्मित आजच्या सभेत त्यांना देखील आदरांजली वाहण्यात आली.

Comments

No comments yet.